मुंबईत राहणाऱ्या ६५ वर्षांच्या लता शिवराज सिंग, या नगरीत नातेवाईक नसल्यानं त्या साकिनाका परिसरातील रुग्णालयातच राहायच्या. पण काही दिवसांपूर्वी हे रुग्णालय बंद झालं. निवाऱ्याचा प्रश्न मोठा होता. वयामुळे अ़डचणींवर मात करण्यासाठी दुसरा मार्गही सापडेना. अशा वेळी साकिनाका पोलीस स्थानकातील पोलीस उपनिरीक्षक निलेश भालेराव यांनी मदतीचा हात पुढे करत लता आजींसाठी निवाऱ्याची सोय केली.

निलेश भालेरावसह या पोलीस स्थानकातील अन्य पोलिसांनी पुढाकार घेऊन त्यांच्यासाठी २३ हजारांची मदत उभी केली. चोवीस तासांच्या आत त्यांच्या राहण्याची व्यवस्था मुंबई पोलिसांनी केली. मदत मागण्यासाठी लता साकिनाका पोलीस स्थानकात आल्या होत्या. गेल्या वीस वर्षांपासून त्या या परिसरातील रुग्णालयात काम करत होत्या. पण अनधिकृत बांधकामुळे हे रुग्णालय तोडण्यात आलं त्यांच्या पोटापाण्याचा, निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला.

लता यांच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. एकूलता एक मुलगा होता त्याचंही दुर्दैवानं निधन झालं. त्यामुळे लता रुग्णालयात छोटं मोठं काम करुन आपलं पोट भरत होत्या. पण अर्थाजन बंद झालं, निवाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला त्यावेळी मात्र मदतीसाठी त्या मुंबई पोलिसांकडे गेल्या. नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांनी मदत उभी करून कर्जतमधल्या वृद्धाश्रमात त्यांची राहण्याची सोय केली. साश्रू नयनांची लता आजींनी पोलिसांना निरोप दिला. या एक दिवसांत पोलिसांनी आईप्रमाणे माझ्यावर माया केली हे सांगायला त्या विसरल्या नाही.