‘अॅपल’ आणि ‘सॅमसंग’ या एकमेकांच्या प्रतिस्पर्धी कंपन्या आहेत हे सर्वश्रुत आहे. या दोन्ही कंपन्यांनी एकाचवेळी आपले सर्वात महागडे फोन बाजारात आणले आहेत. सॅमसंगने ‘गॅलेक्सी एस ८’ आणि अॅपलनं ‘आयफोन X’ हे फोन एकाच वेळी लाँच केले. त्यामुळे ग्राहकांना आपल्याकडे कसे आकर्षित करता येईल, यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अत्यंत मार्मिक जाहिरातबाजी करून सॅमसंगनं अॅपलला चिमटा काढला होता. या फटकेबाजीतून अॅपल सावरत नाही तोच आपल्या स्पर्धकाचे प्रामाणिक ग्राहक आपल्या कंपनीकडे वळवून घेण्यासाठी सॅमसंगने नवीन शक्कल काढली आहे.

VIDEO : सॅमसंगने जाहिरातीतून उडवली अॅपलची खिल्ली

जाणून घ्या ‘आयफोन X’ मुळे कशी होते सॅमसंगची चांदी

अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दक्षिण कोरियाच्या ग्राहकांसाठी सॅमसंगनं भन्नाट ऑफर देऊ केली आहे. इथल्या अॅपल ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी महिनाभरासाठी मोफत फोन वापरण्याची संधी सॅमसंगनं दिली आहे. अॅपलच्या ग्राहकांना नोंदणी शुल्क भरून महिनाभरासाठी सॅमसंगचा ‘गॅलेक्सी एस ८’ फोन वापरता येणार आहे. महिनाभर फोन वापरून झाल्यानंतर अॅपलच्या ‘प्रामाणिक’ ग्राहकांना जर तो फोन आवडला तर ते कंपनीकडून विकत घेऊ शकतात. फोन घेण्याचा निर्णय पक्का झाला की सॅमसंगकडून या ग्राहकांना विशेष भेटवस्तूही देण्यात येणार आहे. जर फोन आवडला नाही तर महिनाभरानंतर तो परत करण्याची मुभाही ग्राहकांना देऊ केली आहे. अॅपलच्या ग्राहकांचं मन इतर कंपन्यांच्या गॅझेटकडे वळवणं तसं अवघड आहे, पण सॅमसंगनं दिलेली ऑफर नाकारण्यासारखी नसल्यानं याला ग्राहक कसे प्रतिसाद देतात, हे पाहण्यासारखं ठरेल. सध्या तरी ही ऑफर दक्षिण कोरियाच्या ग्राहकांसाठीच आहे. पण, सॅमसंगने देऊ केलेल्या या नव्या ऑफरमुळे अॅपलची डोकेदुखी मात्र चांगलीच वाढली आहे.