भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. सानियाने मंगळवारी पहाटे एका गोंडस मुलाला जन्म दिला. २०१० मध्ये सानिया आणि शोएब विवाहबंधनात अडकले होते. त्यानंतर तब्बल ८ वर्षांनी त्यांच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. सोशल मीडियावर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दरम्यान एकीकडे शुभेच्छा दिल्या जात असताना, दुसरीकडे त्यांना ट्रोलही केलं जात आहे. तुमचं बाळ भारतीय असणार की पाकिस्तानी असे प्रश्न दोघांना विचारले जात आहेत. ट्रोल करणाऱ्यांना नेहमीच चोख उत्तर देणाऱ्यांना सानिया मिर्झाने काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं.
सानिया मिर्झा-शोएब मलिक झाले आई-बाबा!
सानिया मिर्झाने सांगितलं होतं की, ‘सेलिब्रिटी असल्या कारणाने अशा पद्धतीचे टॅग्स सार्वजनिक आयुष्याचा एक भाग आहे. मी माझ्या देशासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी खेळते. शोएबदेखील हेच करतो. आम्हाला आमच्या जबाबदाऱ्या चांगल्याच माहित आहेत. आम्ही या पद्धतीचे टॅग्स गांभीर्याने घेत नाही. मीडियासाठी या गोष्टी चांगल्या हेडलाईन्स असू शकतील. पण आमच्या दृष्टीने अशा गोष्टींना काही महत्त्व नाही. घरी आम्ही अशा विषयांवर चर्चा करत नाही’.
सानियाने अजून एका मुलाखतीत आपल्या मुलाचं नाव मिर्झा मलिक असं ठेवणार असल्याचं सांगितलं होतं . माझ्या आणि शोएबच्या नावाने माझं मुल भविष्यात ओळखलं जावं अशी माझी इच्छा असल्याचं सानियाने म्हटलं होतं. ३१ वर्षीय सानिया मिर्झाने २०१० साली पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह केला. हैदराबादमध्ये पारंपरिक पाकिस्तानी पद्धतीनुसार हा विवाहसोहळा पार पडला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 30, 2018 12:36 pm