भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमीत्त २९ ऑगस्टरोजी संपूर्ण देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. मात्र आंध्र प्रदेशात नव्याने स्थापन झालेल्या जगनमोहन रेड्डी सरकारने याच दिवशी मोठी चूक करत सर्वांना टीका करण्याची आयती संधी दिली. विशाखापट्टण शहरात राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या सोहळ्याचे पोस्टर्स लावण्यात आले होते. या फोटोवर धावपटू पी.टी.उषा यांचं नाव देऊन टेनिसपटू सानिया मिर्झाचा फोटो लावण्यात आला होता. सोशल मीडियावर हा फोटो शेअर व्हायला लागल्यानंतर, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत ही सर्व पोस्टर दुपारपर्यंत उतरवली.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी राष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करणाऱ्या आंध्र प्रदेशातील खेळाडूंना रोख रकमेची बक्षिस जाहीर केली. राष्ट्रीय क्रीडा दिनाला या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी विशाखापट्टणमच्या जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी केली होती. कार्यक्रमाच्या बॅनरवर मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, पर्यटनमंत्री मुत्तशेट्टी श्रीनिवास राव यांचा फोटोही छापण्यात आला होता. मात्र सानिया मिर्झाच्या फोटोना नाव देताना अधिकाऱ्यांनी चांगलाच घोळ करत थेट पी.टी.उषा यांचं नाव छापलं.

सानिया मिर्झाच्या सोबतच पी.व्ही.सिंधू, पुलेला गोपिचंद, कोनेरु हम्पी, ध्यानचंद आणि अन्य क्रीडापटूंचे फोटोही यावेळी पोस्टरवर छापण्यात आले होते. दरम्यान ही चूक लक्षात येताच तात्काळ बॅनर हटवण्यात आले, मात्र यावर सरकारकडून कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.