कोराना महामारीनंतर आता पाकिस्तानमध्येही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन झालंय. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) पाकिस्तान सुपर लीगचं (पीएसएल) आयोजन केलं असून जगभरातील विविध खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. रविवारी लाहोर कलंदर्स आणि पेशावर जाल्मी या संघांमध्ये झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू राशिद खानने आपल्या फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधलं. फलंदाजी करताना त्याने धोनी स्टाइलमध्ये एक अफलातून हेलिकॉप्टर शॉट मारत षटकार लगावला.

राशिदने मारलेल्या त्या जबरदस्त शॉटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून इंग्लंड महिला क्रिकेट टीमची माजी विकेटकिपर सारा टेलरलाही राशिदने मारलेला तो उत्तुंग षटकार आणि हेलिकॉप्टर शॉट भलताच आवडलाय. मलाही हा शॉट खेळायला शिकव, अशी मजेशीर प्रतिक्रिया सारा टेलरने ट्विटरद्वारे दिली आहे.


दरम्यान, या सामन्यात लाहोर कलंदर्सने नाणेफेक जिंकून पेशावर जाल्मीला फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. पण, शाहीन आफ्रिदी आणि राशिद खान यांच्या भेदक गोलंदाजीसमोर ते केवळ १४० धावा बनवू शकले. आफ्रिदीने तीन विकेट घेतल्या तर राशिदने चार षटकांमध्ये केवळ १४ धावा दिल्या. नंतर फलंदाजीमध्ये राशिदने १५ चेंडूंमध्ये २७ धावांची आक्रमक खेळी केली. राशिदच्या शानदार कामगिरीच्या जोरावर लाहोर संघाने चार विकेटने विजय मिळवला. तर, शाहिन आफ्रिदीने सामनावीर पुरस्कार पटकावला.