जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक देश म्हणून सौदी अरेबिया ओळखला जातो, येथे पैशांची श्रीमंती असली तरी कित्येक बाबतीत हा देश मागासलेला आहे. आजही स्त्रियांना येथे स्वातंत्र्य देणं म्हणजे कमीपणाचं मानलं जातं, पण हळूहळू या देशातही बदल होत आहे. काही दिवसांपूर्वी येथे फॅशन शोही पार पडला. अर्थात कॅमेरा आणि पुरूषांना पूर्णपणे बंदी या दोन अटींवर हो- नाही करत फॅशन शो पार पाडण्यात आल्याच्या चर्चा दोन महिन्यंपूर्वी होत्या. आता सौदीतला आणखी एक फॅशन शो चर्चेत आलाय आणि चर्चेत येण्यामागचं कारणंही तसंच विचित्र आहे. कारण नुकत्याच पार पडलेल्या या फॅशन शोमध्ये चक्क ड्रोनला कपडे अडकवून हा ड्रोन रॅम्पवर फिरवण्यात आला, त्यामुळे हा ‘फॅशन शो’ कमी आणि एखादं भयपटातलं दृश्य अधिक वाटतं होतं.

जेद्दाहमध्ये गेल्या आठवड्यात हा शो पार पडला. यावेळी चक्क ड्रोनला कपडे अडकवण्यात आले होते. आजही येथे फॅशनशोमध्ये महिलानं मॉडेलिंग करणं गुन्हा मानला जातो, त्यामुळे रमजानच्या महिन्यात पार पडण्यात आलेल्या या फॅशन शोमध्ये महिला मॉडेल किंवा मॅनीक्वीनला कपडे घालून ते रँम्पवर उतरवण्यापेक्षा ड्रोनवर अडकवून ते हॉटेलमध्ये फिरवण्यात आले. हा फॅशन शो पाहण्याची परवानगी फक्त महिलांनाच देण्यात आली होती.

याची व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सौदी अरेबियात फॅशन शो होतोय हे नक्कीच बदलाचं उदाहरण आहे पण त्यासाठी ड्रोनला कपडे अडकवून ते ड्रोन फिरवणं म्हणजे फॅशन शो कमी आणि भयपट पाहणं जास्त वाटत आहे अशा प्रतिक्रिया देत लोकांनी याची खिल्ली उडवली आहे.