जगातील अतिश्रीमंत देशांच्या यादीत सौदी अरेबिया गणला जातो, मात्र स्त्री हक्कांच्या बाबतीत हा देश तितकाच मागासलेला देश म्हणून ओळखला जातो. आजही या देशाला बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. नुकताच स्त्रियांना वाहन चालवण्याची परवानगी देणारा हा देश पुन्हा एकदा चर्चेत आलाय. एका संगीत कार्यक्रमादरम्यान सौदी महिलेनं गायकाला मिठी मारली या ‘अक्षम्य गुन्ह्या’साठी तिला सौदी पोलिसांनी अटक केली आहे.

सौदीतल्या तैफ शहरात संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सौदीतला प्रसिद्ध गायक माजिद उल मोहानदीस सहभागी झाला होता. माजिदला ‘द प्रिन्स ऑफ अरब सिंगिंग’ नावानंही ओळखलं जातं. या कार्यक्रमादरम्यानं एका महिलेनं त्याला मिठी मारली. सुरक्षारक्षकानं तिला तातडीनं बाजूला केला. सौदीतील महिलांना परपुरुषाशी मिळून मिसळून वागण्याचा अधिकार नाही. काही ठिकाणी परपुरुषांसमोर येण्यासही महिलांना पूर्णपणे बंदी आहे. घरातील कर्त्या पुरुषांची परवानगी असल्याशिवाय महिला देश सोडू शकत नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना महिलांसोबत घरातील एक पुरुष सोबत असणं बंधनकारक आहे. असे अनेक जाचक नियम असलेल्या सौदीत एखाद्या महिलेनं गायकालाच मिठी मारणं ही गोष्ट न रुचण्यासारखीच.

या प्रसंगानंतर तिला तातडीनं अटक करण्यात आली. नियम मोडल्याप्रकरणी तिला आता या गुन्ह्यासाठी शिक्षा देण्यात येणार असल्याचं समजत आहे. आश्चर्य म्हणजे तिला पोलिसांनी अटक केल्यानंतर माजिदनं पुन्हा आपला कार्यक्रम सुरू केला. या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया त्यानं दिली नाही.