सौदी अरेबियातील महिला पत्रकार तिच्या कपड्यांमुळे अडचणीत आली आहे. टीव्हीसमोर तिनं आक्षेपार्ह कपडे घातले असल्याचा आरोप करत काही कट्टरपंथीयांनी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गेल्याच आठवड्यात वाहन चालवण्यासाठी महिलांवर घालण्यात आलेली बंदी उठवण्यात आली. या ऐतिहासिक घटनेचं वार्तांकन करण्यासाठी दुबईस्थित अल आन टीव्हीची पत्रकार शिरीन रफाई गेली होती. मात्र यावेळी तिनं परिधान केलेल्या कपड्यांमुळे ती मोठ्याप्रमाणात ट्रोल होत आहे. शिरीननं पायजमा, कुर्ता आणि स्कार्फ परिधान केला होता. मात्र या कपड्यांमुळे अंगप्रदर्शन होत असल्याचा आरोप काहींनी केलाय. शिरीनची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. तिनं अशा प्रकारचे कपडे परिधान करून नियमांचा भंग केला की नाही हे चौकशी करून ठरवण्यात येईल असं इथल्या ऑडिओ व्हिज्युअल मीडियाच्या प्रमुखांनी म्हटलं आहे.

मात्र हे प्रकरण आणखी वाढू नये म्हणून ती देश सोडून निघून गेल्याचं समजत आहे. मी कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह कपडे परिधान केले नसल्याचं तिनं म्हटलं आहे.