भारतीय स्टेट बँकेने (SBI) श्रीनगरला एक अनोखी भेट दिली आहे. श्रीनगरमधील स्थानिक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी एसबीआयने चक्क दल सरोवरातील (Dal Lake) हाऊसबोटवर आपलं फ्लोटिंग एटीएम सुरु केलं आहे. पाण्यात तरंगणाऱ्या या फ्लोटिंग एटीएमचं उद्घाटन एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खरे यांनी केलं आहे. हे फ्लोटिंग एटीएम (Floating ATM)आता स्थानिक लोकांव्यतिरिक्त पर्यटकांच्यासुद्धा रोख रकमेच्या गरजा पूर्ण करेल. अर्थातच हे फ्लोटिंग एटीएम आता श्रीनगरमधील आकर्षणाचं नवं केंद्र बनलं आहे. एसबीआयने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

SBI ने काय सांगितलं?

SBI ने आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, “बँकेने स्थानिक लोक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी श्रीनगरच्या (Srinagar) दल लेकमध्ये हाऊसबोटवर एटीएम सुरु केलं आहे. १६ ऑगस्ट रोजी एसबीआयचे चेअरमन यांच्या हस्ते या फ्लोटिंग एटीएमचं उद्घाटन झालं आहे. श्रीनगरमधील लोकप्रिय अशा दल तलावातील #FloatingATM ही नागरिकांसाठी दीर्घकाळापर्यंतची एक सोय ठरणार आहे.”

एसीबीआयने याबाबत केलेल्या आपल्या ट्विटमध्ये असंही म्हटलं आहे कि, हे फ्लोटिंग एटीएम श्रीनगरच्या आकर्षणात भर टाकणारं आणखी एक आकर्षण ठरत आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी सेवांमध्ये सतत वाढ आणि विविध बदल करत आहे. जेणेकरून ग्राहकांना योग्य सोयी आणि सुविधा उपलब्ध करून देता याव्यात.

श्रीनगरमधील या प्रसिद्ध दल लेकमध्ये फ्लोटिंग भाजी मार्केटसह, फ्लोटिंग पोस्ट ऑफिसही आहे. याचसोबत आता त्यात एसबीआयच्या फ्लोटिंग एटीएमचा देखील समावेश झाला आहे.

केरळमध्ये देखील आहे Floating ATM

आपल्या माहितीसाठी, खरंतर फ्लोटिंग एटीएम असणारं श्रीनगर हे देशातील दुसरं ठिकाण ठरत आहे. कारण, यापूर्वी म्हणजेच २००४ मध्ये भारतीय स्टेट बँकेने 2004 मध्ये केरळमध्ये फ्लोटिंग एटीएम सुरू केलं होतं. हे फ्लोटिंग एटीएम केरळ शिपिंग आणि इनलँड नेव्हिगेशन कॉर्पोरेशनच्या (KSINC) ‘झांकर नौका’वर सुरु करण्यात आलं आहे.