उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग उन याच्या क्रूरतेच्या गोष्टी जगाला काही नवीन नाहीत. आपल्या अधिकाऱ्याला तोफेच्या तोंडी देणे, काकाच्या अंगावर कुत्रे सोडून त्याला ठार मारणं, युएनला भीक न घालता वारंवार क्षेपणास्त्रांची चाचणी करणे अशा एक न अनेक गोष्टी या क्रूर हुकूमशहाच्या विक्षिप्तपणाची उदाहरणं आहेत. किमबद्दल अनेकांना कुतूहल आहे, नुकत्याच त्याच्या वर्गमित्रांनी त्याच्याबद्दल काही रंजक गोष्टी उघड केल्या आहेत. किम जाँगचे वडिल किम जाँग इल हे उत्तर कोरियाचे हुकूमशहा होते. किमचं बालपण हे स्विर्त्झलंडमध्ये गेलं. स्विर्त्झलंडमध्ये तो नाव बदलून शिक्षण घेत होता.

स्विर्त्झलंडमध्ये किमची ओळख लपवण्यात आली होती. तिथे तो उत्तर कोरियाच्या दूतावासातील एका कर्मचाऱ्याचा मुलगा म्हणून वावरत होता. त्याला शाळेतील सर्वच मुलं पॅक उन या नावानं ओळखायची असं त्याच्या वर्गमित्र मिकायलोनं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. मिकायलो हा बर्नमधील एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करत आहेत. किम हा शाळेतला सर्वात गुणी मुलगा होता. अनेकांच्या तो आवडीचा होता. तसेच त्याला फुटबॉल हा खेळ प्रचंड आवडायचा असंही मिकायलो म्हणाला. वर्गात तो नेहमी शांत असायचा, त्याची विनोदबुद्धी तर कमालीची होती त्याचं खळखळून हसणं सगळ्यांनाच आवडाचं असंही तो म्हणाला.

गर्लफ्रेंडसोबत घडलेला ‘तो’ प्रसंग खरंतर उत्तर कोरियातील हुकूमशहाच्या क्रौर्याचा पहिला टप्पा होता

किमचा आणखी एक वर्गमित्र मार्को यानंदेखील किमबद्दल अशीच एक रंजक गोष्ट सांगितली. किमला नेहमीच जिंकायला आवडायचं. त्याला हरणं पसंत नव्हतं असंही मार्को म्हणाला. त्याची विनोदबुद्धी अफलातून होती, स्विर्त्झलंडच्या शाळेत अनेक देशांतील नागरिकांची मुलं होती. त्यातले काही विद्यार्थी तर उत्तर कोरियाच्या शत्रू राष्ट्रातले होते. पण, तरीही किम सगळ्यांशी खूप चांगलं वागायचा इतकंच नाही तर या सगळ्या विद्यार्थ्यांशी त्याची खूप चांगली गट्टी होती असंही तो म्हणाला.