पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहिर केल्यानंतर जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. आता या नोटांचे मुल्य शून्य झाले आहे. पण या जुन्या नोटांची किंमत शून्य असली तरी याच ५०० रुपयांच्या नोटेपासून ओडिशामध्ये राहणा-या एका विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याने चक्क विद्युत निर्मिती केली आहे.

वाचा : या खास शाईमुळे पकडल्या जात आहेत ५०० आणि २००० च्या नोटांची बंडले

जिथे जुन्या ५०० रुपयांच्या नोटांची किंमत आता कागदाच्या तुकड्याइतकी राहिली आहे. अशा जुन्या नोटेपासून ओडिशामध्ये राहणा-या लच्छमन दुंडी या तरुणाने चक्क विद्युतनिर्मिती केली आहे. ‘डेक्कन क्रोनिकल’ने दिलेल्या माहितीनुसार ओडिशाच्या नौपाडाध्ये जिल्हात राहणा-या लच्छमनने ५०० रुपयांच्या नोटांचा वापर करून हा शोध लावला आहे. लच्छमन हा ओडिशाच्या खारिअर महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकतो. ‘या नोटांच्या एका बाजूला सिलिकॉन प्लेट्स लावून ही नोट सूर्य प्रकाशात किंवा ऊर्जेच्या इतर स्त्रोताजवळ ठेवली असता सिलिकॉन विद्युत निर्मिती करण्यास सुरूवात करतो.’ असेही त्यांनी या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. यापासून ५ व्होल्टपर्यंत विद्युतनिर्मित होऊ शकते असेही त्यांने सांगितले. तसेच इलेक्ट्रीक व्हायरमार्फत ही नोट जर ट्रान्सफॉर्मरला जोडली तर २२० व्होल्टपर्यंत विद्युतनिर्मिती होऊ शकते. ज्याने पंखा फिरु शकतो किंवा एक ब्लब देखील प्रकाशमान होऊ शकतो असा दावा लच्छमनने केला आहे.

सध्या लच्छमनच्या शोधावर अधिक अभ्यास केला जात आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर जुन्या पाचशे रुपयांच्या नोटांचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल. कारण, नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात जमा करण्यात आलेल्या नोटांचे करायचे काय असा प्रश्न पडला होता. रिझर्व्ह बँकेच्या केरळमधल्या शाखेने या जुन्या नोटा हार्डबोर्ड बनवणा-या फॅक्टरीला पुनर्वापरासाठी देऊ केल्या होत्या. कुन्नरमध्ये ‘द वेस्टर्न प्लाईवुड्स लिमिटेड’ ही देशातील एकमेव हार्डबोर्ड बनवणारी कंपनी आहे. या कंपनीला बँकेत जमा झालेल्या हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा आरबीआयने दिल्या. फॅक्टरीमध्ये या जुन्या नोटांचे बारीक तुकडे केले जाणार आहेत. त्यानंतर त्याचा लगदा बनवण्यात येईल. या नोटांचा लगदा आणि लाकडाचा लगदा एकत्र करून त्यापासून हार्डबोर्ड बनण्यात येणार असल्याचे समजते आहे. ‘द वेस्टर्न इंडिया प्लाईवुड्सचे लिमिटेड’चे व्यवस्थापकिय संपादक मयान मोहम्मद यांनी एनडीटीव्ही इंडियाला याबद्दलची माहिती दिली होती. रिझर्व्ह बँक प्रत्येक वर्षाला चलन छापण्यासाठी ४० कोटी रूपये खर्च करते. पण नोटाबंदीच्या निर्णयानंतर मात्र या चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा जाळून किंवा पुरून टाकण्याचा निर्णय आरबीआयने घेतला होता.