20 January 2021

News Flash

गंजलेल्या पाईपांमधून येणाऱ्या पाण्यामुळे होऊ शकतो कॅन्सर; संशोधकांचा दावा

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियामधील संशोधनातून झाला धक्कादायक खुलासा

प्रातिनिधिक फोटो (मूळ फोटो एएफपीवरुन साभार)

पाईप लाइन फुटली किंवा पाईप लाइनच्या दुरुस्तीनिमित्त पाणी पुरवठा होणार नाही किंवा एखादा पत्ता सांगताना पाईप लाइन रोड एवढाच काय तो आपला आणि पाईप लाइनचा संबंध. बाकी आपल्या घरात नळाने येणारं पाणी हे कोणत्या पाईपाने आणि कशाप्रकारे आपल्या घरापर्यंत येतं याच्याशी आपल्याला फारसं देणं घेणं नसतं. मात्र तुमच्या घरात येणाऱ्या याच नळाच्या पाण्याचे पाईपांसंदर्भात नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाणी वाहून नेणारे पाईप गंजलेले असतील तर पाईपमधील लोखंडाचा गंज आणि पिण्याच्या पाण्यामधील अशुद्धता घालवण्यासाठी वापरण्यात आलेले निर्जंकुकीकरणाच्या औषधांमधील काही घटकांची रासायनिक प्रक्रिया होते. धक्कादायक बाब म्हणजे यामुळे कॅन्सरचा धोका निर्माण करणारे घटक पाण्याच्या माध्यमातून मानवाच्या शरिरामध्ये जातात.

अमेरिकेतील रिव्हरसाइड येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियामध्ये पिण्याचे पाणी आणि गंजलेल्या पाईपांसंदर्भात झालेल्या संशोधनामधून ही माहिती समोर आली आहे. पाण्यातील औषधांमधील घटक आणि गंज लागलेल्या पाईपामधील रासायनिक प्रक्रियेनंतर तयार झालेल्या घटकांना कार्सियोजेनिक हेक्साव्हेलेंट क्रोमिएम असं म्हणतात. क्रोमिएम हा धातू नैसर्गिकपणे माती आणि जमीनीखालील पाण्यामध्ये काही प्रमाणात असतो. सर्वासामान्यपणे पाण्यामध्ये क्रोमिएमचा अंश सापडणे काही विशेष मानले जात नाही. क्रोमिएममुळे लोखंड लवकर गंज पकडत नाही. मात्र काही रासायनिक प्रक्रियांमध्ये क्रोमिएमच्या मूल घटकांमध्ये बदल होतो आणि त्याचे रुपांतर हेक्साव्हेलेंटमध्ये होतं. या हेक्साव्हेलेंटमुळे जणुकांवर परिणाम होऊन कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

मार्लेन अ‍ॅण्ड रोजमेरी बोर्न्स कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमध्ये पाण्याचे रसायनशास्त्र या विषयाचा अभ्यास करणारे प्राध्यापक आणि रसायनशास्त्रज्ञ हायजोऊ लुई यांनी यासंदर्भातील संशोधन केलं आहे. पाण्यातील निर्जुंकीकरण करण्यासाठी वापरण्यात आलेले घटक आणि गंजलेल्या लोखंडामधील क्रोमियममध्ये रासायनिक प्रक्रिया होऊ शकते का यासंदर्भात लुई यांना शंका होता. त्यांंनी डॉक्टरेट करणारा विद्यार्थी चेंग टॅन आणि डॉक्टरेटचे शिक्षण पूर्ण करुन संशोधन करणाऱ्या सुमंत अवरसरला यांच्या मदतीने हे संशोधन करण्यात निर्णय घेतला. या अभ्यासामध्ये संशोधकांनी पाच ते सत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये पाणी वाहून नेणाऱ्या पाईपांचे नमूने घेतले.

या पाईपांवरील गंज काढून त्याची पावडर करण्यात आली. त्यानंतर या पावडरमध्ये क्रोमियमचे प्रमाण किती आहे याची तपासणी करण्यात आली. नंतर हे नमूने हायपोक्लोरस अ‍ॅसिडमध्ये टाकण्यात आले. पिण्याचे पाणी ज्या प्रकल्पांमधून येते तिथे पाण्याच्या शुद्धीकरणासाठी हायपोक्लोरस अ‍ॅसिड प्रकारातील क्लोरिन वापरले जात असल्याने या अ‍ॅसिडची निवड करण्यात आली.

लुई यांनी जारी केलेल्या पत्रकामध्ये, “या नव्या संशोधनामुळे आपण ज्या पारंपारिक पद्धतीने हेक्साव्हेलंट क्रोमियमच्या पाण्यातील प्रमाणाकडे पाहत होतो त्यासंदर्भात दृष्टीकोन बदलला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणांची देखभाल करणे आणि नळावाटे घातक घटक असणारे पाणी सर्वसामान्यांपर्यत पोहचू नये यासाठी काळजी घेणे किती महत्वाचे आहे, हे या संशोधनामधून अधोरेखित झाले आहे,” असं म्हटलं आहे.

जगभरामध्ये पाणीटंचाईची समस्या दिवसोंदिवस तोंड वर काढताना दिसत असतानाच हे संशोधन समोर आलं आहे. पाण्यामध्ये हे घातक घटक निर्माण होऊ नयेत म्हणून क्रोमियमसोबत रासायनिक प्रक्रिया न करणाऱ्या रसायनांचा समावेश असणारी औषधं पाणी शुद्धिकरणासाठी वापरावीत असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 3:56 pm

Web Title: scientists are warning that drinking water from rusted pipes can cause cancer scsg 91
Next Stories
1 यापैकी किती भारतीयांची नावं तुम्हाला माहितीये? महिंद्रांचा प्रश्न; बरोबर उत्तर देणाऱ्यास मिळणार ‘खास गिफ्ट’
2 आली लहर केला कहर! बर्गर खाण्यासाठी बूक केलं चक्क हेलिकॉप्टर
3 Shocking Video : वृद्ध महिलेच्या अंगावरून गेला ट्रक, नंतर…; अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ व्हायरल
Just Now!
X