एखाद्या क्षेत्रात उल्लेखनीय उंची गाठण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते असं म्हणतात ते खरंच आहे. अर्थात मेहनतीचं हे स्वरुप मात्र अनेकदा वेगळं असतं. केरळच्या एका तरुण फोटोग्राफरला याचा प्रत्यय येत असावा. काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. झाडावर उलटं लटकून नवविवाहित जोडप्याचा फोटो काढण्यासाठी खटाटोप करणाऱ्या फोटोग्राफरची कला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

फक्त फोटोग्राफीच नव्हे तर, स्वत:वर असणारं नियंत्रण आणि आत्मविश्वास या दोन महत्त्वाच्या गोष्टींची झलकसुद्धा या व्हिडिओतून दिसतेय. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या फोटोग्राफविषयी जाणून घेण्यासाठीसुद्धा अनेकांमध्येच उत्सुकता पाहायला मिळाली. ‘द न्यूज मिनिट’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार तो २३ वर्षीय विष्णू हा फोटोग्राफर मुळचा केरळच्या थ्रिसूर येथील असून, आता तेथे त्याचा उल्लेख ‘वव्वल’ (मल्याळम भाषेत वव्वलचा अर्थ वटवाघूळ’ असा होतो) असा करण्यात येत आहे. झाडावर लटकण्याचा त्याचा अंदाज पाहताच ही हटके ओळख त्याला मिळाली आहे.

केरळातील ‘व्हाईट रॅम्प’ या ग्रुपसोबत विष्णू काम करत असून, १५ एप्रिलला शिआज आणि नव्या यांच्या लग्नाचे फोटो काढण्यासाठी गेला होता. या एका लग्नसोहळ्यामुळे आपलण इतके प्रकाशझोतात येऊ याची त्यालाही कल्पना नव्हती. फोटो काढण्याच्या या अनोख्या कल्पनेविषयी विचारलं असता तो म्हणाला, ‘लग्न झाल्यानंतर आम्ही नवरदेवाच्या घराबाहेर फोटो काढत होतो. त्याचवेळी मी ते झाड पाहिलं. झाड माझ्या नजरेस पडताच त्यावरुन फोटो काढला तर तो किती छान दिसेल, अशी कल्पना मला सुचली. मुख्य म्हणजे मी नवविवाहित जोडप्याला ही कल्पना सांगितली तेव्हा तेसुद्धा मोठ्या उत्साहात या फोटोसाठी तयार झाले आणि अखेर तो फोटो काढला.’

वाचा : ऑलिम्पिक पदकाचा वेध घेण्याचे स्वप्न!

आपण करत असलेल्या कामामध्ये जीव ओतून एखादी सुरेख गोष्ट साध्य करु पाहणारा विष्णू सध्या सोशल मीडियावर सेलिब्रिटीच झाला आहे. अनेकांनीच त्याचा हा व्हिडिओ आणि त्याने काढलेला फोटो शेअर करत त्याच्या कलेची प्रशंसा केली आहे.