जगभरातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या सुरक्षेबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित होत असतात, फेसबुकही त्याला अपवाद नाहीये. सध्या फेसबुकवर एका महिलेच्या अकाउंटबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. फेसबुकवर सेलेन डेलगाडो लोपेज (Selene Delgado Lopez) नावाची ही महिला बहुतांश युजर्सच्या फ्रेंड लिस्टमध्ये असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे अनेकांच्या फ्रेंड लिस्टमध्ये ही महिला आपोआप अ‍ॅड झाल्याचं समजतंय, आणि त्याहून हैराण करणारी बाब म्हणजे तिला Unfriend देखील करता येत नाहीये.

फेसबुक अकाउंटवरील प्रोफाइल फोटोमध्ये ‘सेलेन डेलगाडो लोपेज’ नावाच्या या महिलेने केशरी रंगाचा टॉप घातलेला दिसत आहे. तिच्या प्रोफाइलनुसार ती मेक्सिकोच्या लियोन शहराची रहिवासी आहे. याशिवाय तिने प्रोफाइलवर अन्य माहिती दिलेली नाहीये. गोंधळलेले युजर्स लोपेजबाबत रेड्डिट, फेसबुक आणि ट्विटर यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, अनेक युजर्स या अनोळखी ‘फ्रेंड’ला unfriend कसं करावं याबाबत विचारणा करत आहेत. हे फेसबुक पेज नसून एका व्यक्तीचं अकाउंट आहे, तरी तिच्या प्रोफाइलवर Add Friend हा पर्याय नाहीये. तिथे थेट “send message हा पर्याय आहे. काही युजर्स Add Friend पर्याय मर्यादित ठेवतात. त्यावेळी कॉमन फ्रेंड्स नसल्यास फक्त send message पर्याय दिसतो. पण हे अकाऊंट आपल्या फ्रेंडचं असलं तरी तिच्या अकाऊंटवर Add Friend ऐवजी send message हाच पर्याय दिसतोय.

सर्व युजर्सच्या फ्रेंड लिस्टमध्ये? :-
लोपेजची प्रोफाइल प्रायव्हेट असून केवळ फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यासाठी सेट करण्यात आली आहे. याशिवाय लोपेजच्या प्रोफाइलवरुन या वर्षी 27 एप्रिलनंतर एकही पोस्ट अपडेट झालेली नाही. प्रोफाइलवर केवळ दोन पोस्ट आणि तीन फोटो असल्याचं समजतंयच. त्यामुळे बहुतांश युजर्सच्या फेसबुक फ्रेंडलिस्टमध्ये असलेल्या सेलेन लोपेजच्या अकाउंटबाबत शंका व्यक्त होत आहेत. कोट्यवधी युजर्स फेसबुक वापरतात आणि एका व्यक्तीला फक्त 5,000 फ्रेंड्सना स्वीकारता येतं, त्यामुळे सर्व युजर्सच्या फ्रेंड लिस्टमध्ये ही महिला नसेल असंही मानलं जात आहे.

कोण आहे Selene Delgado Lopez?
फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, ‘सेलेन डेलगाडो लोपेज’ या नावाची एक मेक्सिकोची महिला जवळपास 30 वर्षांपूर्वी गायब झाली होती. एका मेक्सिकन न्यूज चॅनेलमध्ये जाहिरातीदरम्यान तिचं नाव हरवलेल्या व्यक्तींच्या यादीत दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर चॅनेलने काही दिवसांपूर्वी मध्यरात्री सोशल मीडियावर तिच्याबाबत एक छोटा व्हिडीओ शेअर केला होता. तो व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच ट्रेंडमध्ये आला आणि त्यानंतर या महिलेच्या फोटोसह अनेक फेक अकाऊंट बनले असं सांगितलं जात आहे.

सतर्क राहण्याची गरज :-
दरम्यान, सध्यातरी या फेसबुक अकाऊंटपासून कोणता धोका झालेला नाही. मात्र हे अकाउंट इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामुळे अगदी कमी कालावधीत सायबर सिक्युरिटीचा धोका उद्भवू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. या अकाउंटमार्फत चुकीची माहिती पसरवली जाऊ शकते किंवा काही लिंक टाकून इंटरनेट घोटाळा केला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे तुम्हीही सतर्क राहण्याची गरज आहे.