करोना विषाणूचा प्रसार जगभरात झाला आणि त्याचा अधिकाधिक प्रसार होऊ नये यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सोडता लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं. सार्वजनिक वाहतुकीचे सर्व पर्याय बंद करण्यात आले. लॉकडाउनमुळे लोकांना त्यांचे सर्व प्लॅन, सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करावे लागले. पण म्हणतात ना, की प्रेमापोटी माणूस काहीही करू शकतो. एकमेकांच्या प्रेमापोटी एका वृद्ध जोडप्याने लॉकडाउनच्या काळात ‘झूम व्हिडीओ कॉल’द्वारे आयुष्यभरासाठी एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या.

९५ वर्षांचे आजोबा व ८५ वर्षांच्या आजी यांनी व्हिडीओ कॉलद्वारे लग्न केलं. ‘सीबीएस न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, ओहिओत राहणारे अल्विन ली आणि डोरोथी ड्रिस्केल २०१९ मध्ये एकमेकांना भेटले. मार्च महिन्यात त्यांचा लग्नसोहळा पार पडणार होता. मात्र लॉकडाउन आणि करोना व्हायरसमुळे लग्नसोहळ्यावर पाणी फेरलं.

या वृद्ध जोडप्याने तरीही लग्न करण्याचा निर्णय पक्का केला. पुजाऱ्यालाही व्हिडीओ कॉल केला आणि या जोडप्याने लग्नाच्या वचनांची देवाणघेवाण केली.