भारत व चीन सारखे देश लोकसंख्या वाढीच्या समस्येचा सामना करत असताना युरोपमधील सर्बिया देश लोकसंख्या वाढत नसल्याचे चिंतेत आहे. यामुळे येथील सरकारने दाम्पत्यांना मुले जन्माला घालण्याचे आवाहन केल्याची अनोखी बाब समोर आली आहे. लोकसंख्येची समस्या दूर करण्यासाठी याठिकाणी घोषणाबाजीही केली जात आहे. पण देशातील महिलांनी प्रेरणादायक शब्दांपेक्षा मुले जन्माला घालण्यासाठी चांगल्या सहकाऱ्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

सर्बियातील अनेक लोक देश सोडून जात आहेत. सोबतच येथील जन्मदर वेगाने घटत चालले आहे. देशामध्ये सरासरी प्रत्येक दोन कुटुंबामध्ये तीन बालके आहेत. युरोपमधील ही सर्वात कमी सरासरी आहे. यामुळे सर्बियाची लोकसंख्या ७० लाखांवर येवून ठेपली आहे. संयुक्त राष्ट्राच्या एका अंदाजानूसार २०५० पर्यंत सर्बियाची लोकसंख्या १५ टक्क्यांनी कमी होवू शकते. त्यामुळे सर्बियाला विविध अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. यावर मात मिळविण्यासाठी सर्बियाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. याअंतर्गत लोकांना मुले जन्माला घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकसंख्या वाढविण्यासाठी दाम्पत्यांनी जास्ती जास्त लेकरांना जन्माला घालावे, असे येथील सरकारने म्हटले आहे.