दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉन्टी ऱ्होड्स हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक मानला जातो. जॉन्टीच्या हवेत सूर मारुन कॅच पकडण, चपळाईने थ्रो यासारख्या अनेक कसरती आपण अनुभवल्या आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतरही जॉन्टी ऱ्होड्स आयपीएलमध्ये प्रशिक्षणाचं काम करत होता. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मांजरीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात एक मुलगी गोल्फच्या स्टिकने बॉल मारत आहे…तर मांजरही एखाद्या कसलेल्या खेळाडूसारखी तो चेंडू लगेच पकडताना दाखवलं आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू डिन जोन्स यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला होता. सचिन तेंडुलकरने या व्हिडीओत जॉन्टी ऱ्होड्सला टॅग करत…ही मांजर तुला तगडी टक्कर देईल असं म्हटलं आहे.

जॉन्टी ऱ्होड्सचं भारतप्रेम सर्वश्रृत आहे. अनेक वर्ष जॉन्टी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा फिल्डींग प्रशिक्षक होता. इतकच नव्हे तर जॉन्टीने आपल्या मुलीचं नावंही इंडिया ठेवलं आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी जॉन्टी ऱ्होड्स किंग्ज इलेव्हन पंजाबचा फिल्डींग प्रशिक्षक म्हणून काम करणार आहे.