तुमच्यापैकी कदाचित कोणीही असा नसेल जो युट्यूबवरील व्हिडीओ पाहत नसावा. पण तुम्हाला युट्यूबवर सर्वाधिक कमावणारा कोण आहे हे माहितीये का? तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल की युट्यूबवर सर्वाधिक कमाई करणारा एक अवघ्या सात वर्षाचा लहानगा मुलगा आहे.

फोर्ब्स मासिकाने नुकतीच जून 2017 ते जून 2018 दरम्यान युट्यूबद्वारे सर्वाधिक कमाई करणाऱ्यांची एक यादी जाहीर केली आहे. यामध्ये अमेरिकेतील रेयान हा अवघ्या सात वर्षांचा मुलगा अव्वल स्थानावर आहे. या कालावधीतील त्याची कमाई तब्बल 22 दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास 155 कोटी रुपये आहे. युट्यूबवर Ryan ToysReview या नावाने त्याचं स्वतःचं एक चॅनल आहे. या चॅनलवर केवळ विविध प्रकारच्या खेळण्यांचे रिव्ह्यू तो देत असतो. रेयानच्या युट्यूब चॅनलला सध्या 1.73 कोटींहून जास्त जणांनी(17,314,022 युजर्स) सबस्क्राइब केलंय.

कशी झाली सुरूवात – गेल्या वर्षी वॉशिंग्टन पोस्टला त्याच्या आईने मुलाखत दिली होती. त्यावेळी त्याच्या आईने सांगितल्यानुसार, रेयान तीन वर्षांचा होता तेव्हाच युट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचार डोक्यात आला होता. रेयान लहानपणा पासूनच खेळण्याचे रिव्ह्यू देणारे टीव्ही चॅनल पाहायचा. एक दिवस आम्ही खेळण्याच्या दुकानात गेलो होतो, तेथून लीगो ट्रेन खरेदी केली आणि तेथूनच युट्यूब चॅनलची सुरूवात झाली, असं त्याच्या आईने सांगितलं.  त्यावेळी तो केवळ चार वर्षांचा होता. मार्च 2015 मध्ये रियानने हे चॅनल सुरू केलं होतं. त्यानंतर जानेवारी 2016 पर्यंत म्हणजे केवळ 10 महिन्यांमध्येच त्याच्या चॅनलचे 10 लाखांहून जास्त सबस्क्राइबर झाले होते. गेल्या वर्षी त्याची कमाई 11 मिलियन डॉलर होती. त्यावेळी सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये तो आठव्या क्रमांकावर होता, मात्र यावर्षी त्याने थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. वर्ष 2015 च्या जुलै महिन्यात रेयानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि या व्हिडीसोबतच त्याचं नशीब देखील फळफळलं. त्या व्हिडीओत रेयानने 100 कार असणाऱ्या एका खेळण्याचा रिव्ह्यू केला होता आणि या व्हिडीओला तब्बल 935 मिलियन व्ह्यूज मिळाले होते. आता खेळण्यांसोबतच रेयान लहान मुलांच्या खाण्यापिण्याच्या पदार्थांचाही रिव्ह्यू करतोय.

सर्वाधिक कमाई करणारे टॉप-10 युट्यूब चॅनल्स –

– रेयान टॉयज रिव्ह्यू (Ryan Toys Review) 22 दशलक्ष डॉलर (154.84 कोटी रुपये)

– जॅक पॉल (Jake Paul) 21.5 दशलक्ष डॉलर (151.32 कोटी रुपये)

– ड्यूड परफेक्ट (Dude Perfect) 20 दशलक्ष डॉलर (140.74 कोटी रुपये)

– डेन टीडीएम (DanTDM) 18.5 दशलक्ष डॉलर (130.21 कोटी रुपये)

– जेफ्री स्टार (Jeffree Star) 18 दशलक्ष डॉलर (126.67 कोटी रुपये)

– मार्किप्लायर (Markiplier) 17.5 दशलक्ष डॉलर (123.15 कोटी रुपये)

– व्हेनस गेमिंग (Vanoss Gaming) 17 दशलक्ष डॉलर (119.63 कोटी रुपये)

– जॅकसेप्टिस आय (Jacksepticeye) 16 दशलक्ष डॉलर (112.61 कोटी रुपये)

– प्यूडायपाय (PewDiePie) 15.5 दशलक्ष डॉलर (109 कोटी रुपये)

– लोगन पॉल (Logan Paul) 14.5 दशलक्ष डॉलर (102 कोटी रुपये)

स्विडनचा कॉमेडियन आणि व्हिडीओ गेमचा समालोचक फेलिक्स ज्वेलबर्ग याचं युट्यूब चॅनल ‘प्यूडायपाय’ सध्या सर्वाधिक सबस्क्राइबर असणारं चॅनल आहे. त्याच्या चॅनलकडे 7.39 कोटींहून जास्त सबस्क्राइबर आहेत, मात्र कमाईच्या बाबतीत हे चॅनल नवव्या क्रमांकावर आहे. या चॅनलची कमाई 15.5 दशलक्ष डॉलर म्हणजे जवळपास 109 कोटी रुपये आहे.