पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी हा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. विशेषकरुन काश्मीरविषयी केलेल्या वक्तव्यांमुळे आफ्रिदीला नेहमी टीकेचं धनी व्हावं लागतं. काही दिवसांपूर्वी आफ्रिदीला करोनाची लागण झाली होती. यानंतर त्याने स्वतःला क्वारंटाइन करुन घेत उपचार सुरु केले आहेत. काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये अतिरेकी आणि भारतीय जवानांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत एका स्थानिक व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले. काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात सीआरपीएफ पथकावर हल्ला करण्यात आला होता.

यावेळी हल्ल्यात प्राण गमावलेल्या व्यक्तीच्या शेजारी लहान मुलगा बसून रडत होता. भारतीय जवानांनी अतिरेक्यांना प्रत्युत्तर देताना त्या लहान मुलाला गोळीबारापासून बचावलं. हा प्रकार थांबल्यानंतर जवानांनी या मुलाला गाडीमध्ये बसवून त्याला शांत करण्याचाही प्रयत्न केला. परंतू आफ्रिदीने या फोटोचा वापर करत भारतीय लष्करावर आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन टीका केली.

मात्र भारतीय नेटकऱ्यांनीही आफ्रिदीच्या या ट्विटला प्रत्युत्तर देत, भारतीय जवानांचं खरं रुप अभिमानाने जगासमोर मांडलं आहे.

सुरक्षा जवान आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी गेल्या काही दिवसांमध्ये काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांवर कारवाई करत अनेकांना ठार केलं आहे. यामुळे दहशतवादी वारंवार जवनांवर हल्ला करत असून यावेळी स्थानिक नागरिक तसंच लहान मुलांनाही टार्गेट करत आहेत. काही दिवसांपूर्वी दहशतवद्यांनी अनंतपोरा येथे केलेल्या हल्ल्यात एका पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता.