News Flash

५२ मराठी महिला असलेली बस दिल्लीत गायब; पण पवारांनी बातमी थांबवली कारण…

"महाराष्ट्रातल्या दिल्लीतील विविध पक्षांच्या चार नेत्यांना फोन केला पण फक्त पवारांनी प्रतिसाद दिला"

शरद पवार व पत्रकार नितीन वैद्य

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतरची ही घटना आहे.  त्यावेळी महाराष्ट्रातल्या अंगणवाडीतील महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीत मोर्चा नेला होता. साधारणपणे देशभरातले लोक दिल्लीत कुठल्याही कामासाठी आले की दिल्ली दर्शन केल्याशिवाय परतत नाहीत. त्याला अनुसरून मोर्चा पार पडल्यानंतर या महिलांनी चार बस भाड्यानं केल्या आणि दिल्ली दर्शनाला निघाल्या. रात्रीच्या सुमारास बसेस मुक्कामी परत आल्या तेव्हा लक्षात आलं की तीनच बस आल्यात नी 52 महिला असलेली एक बस आलेलीच नाही.

बराचवेळ वाट बघून एका महिलेनं सुचवलं की दिल्लीत महाराष्ट्रातले पत्रकार आहेत नितीन वैद्य नावाचे, त्यांच्याशी संपर्क साधुया. एका महिलेने वैद्य यांच्याशी रात्री साडेदहा अकराच्या सुमारास संपर्क साधला आणि समस्या सांगितली. लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना नितीन वैद्य यांनीही आठवणीला उजाळा दिला आणि घडलेली हकीकत सांगितली. “रात्री अकराच्या सुमारास जेव्हा फोन आला की महाराष्ट्रातल्या 52 महिला असलेली बस गायब आहे. ही मोठी आपत्ती असल्यामुळे काही तरी केलं पाहिजे असं मला वाटलं.  मला सारखा फोन करून काही पत्ता लागत नाहीये असं सांगत होत्या. रात्रभर महिलांचा पत्ता लागल्याची चांगली बातमी येईल म्हणून मी जागाच होतो पण तसं काही झालं नाही,” वैदय यांनी सांगितलं.

अखेर मध्यरात्रही उलटून गेल्यावर मी महाराष्ट्रातल्या दिल्लीत असलेल्या चार नेत्यांना फोन करायचं ठरवलं, वैद्य म्हणाले. “पहाटे चार ते पाचच्या दरम्यान मी चौघांना फोन केला, ज्यातले एक शरद पवार होते जे काही कामासाठी दिल्लीत आले होते. इतर तीन नेत्यांकडून काही प्रतिसाद मिळाला नाही, परंतु पवारांनी स्वत:च माझा फोन घेतला आणि म्हणाले बघतो काय करता येईल ते. साडे सातच्या सुमारास पवारांचाच मला फोन आला की बससह महिलांचा पत्ता लागला आहे. त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले.

झालेलं असं या बसमधल्या महिलांनी ड्रायव्हरला राजी केलं आणि दिल्ली दर्शन झाल्यावर बस परस्पर हरिद्वारला नेली देवदर्शनासाठी. इकडे सगळे काळजी करत होते आणि या महिला दिल्लीपासून सुमारे 250 किलोमीटर दूर असलेल्या हरिद्वारला पोचल्या होत्या. शरद पवारांनी दखल घेत पोलीस आयुक्तांशी संपर्क साधल्यानंतर व घटनेचं गांभीर्य सांगितल्यानंतर पोलिसांनी सगळ्या दिशांना शोध घेण्याचे संदेश पाठवले. अखेर सदर बस हरिद्वारला असल्याचे तिथल्या पोलिसांनी दिल्लील पोलिसांना कळवलं. त्यावेळी शरद पवार स्वत: पोलिस ठाण्यात होते. पवारांनी हरिद्वारच्या पोलिसांना बसमधल्या महिला 52च आहेत ना, ज्या शोधतोय त्या सगळ्या आहेत ना याची खात्री करायला लावली. ती झाल्यावर ते मुंबईला रवाना झाले. यावेळी एक विशेष प्रसंग घडला ते म्हणजे पवारांनी वैद्यना सांगितलं की याची बातमी करू नका. वैद्य सांगतात, “मी पवारांना विचारलं याची बातमी का नको करू?. तर पवार म्हणाले तुमची बातमी होईल, परंतु या महिलांचे पती पुढे आयुष्यात त्यांना कुठल्याही सार्वजनिक कामासाठी जाऊ देणार नाहीत. या महिलांच्या उर्वरीत आयुष्याचा विचार केला तर त्याची बातमी न झालेलीच चांगली.”

वैद्य यांनीही त्यांचं म्हणणं मानलं आणि बातमी केली नाही. परंतु, पवारांच्या वाढदिवसानिमित्त काही वर्षांपूर्वी एक विशेषांक काढण्यात आला होता. त्या घटनेलाही बराच काळ लोटला होता त्यामुळे या अंकात वैद्य यांनी ही घटना लिहिली होती.
सध्या शरद पवारांवर शिखर बँक घोटाळाप्रकरणी ईडीनं गुन्हा दाखल केला आहे, आणि पवार पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांच्याबद्दलचा हा किस्साही चांगलाच व्हायरल होतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 3:09 pm

Web Title: sharad pawar new delhi maharashtra bus haridwar journalist nitin vaidya
Next Stories
1 पुणे: आंदोलकर्त्यांनो जरा हे बघा…तुम्ही केलेला कचरा पोलिसांनी केला साफ
2 हॅप्पी बर्थडे, गुगल!
3 फक्त झाडांवरील बेडूक खाणाऱ्या सापाचा शोध
Just Now!
X