करोना संकटावर मात करण्यासाठी मदतीची तयारी दाखवणारे देशातील पहिले उद्योगपती म्हणून आनंद महिंद्रा हे समोर आल्यानंतर सोशल मीडियातून त्यांचं कौतुक होत असताना आता काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनीही महिंद्रांचं कौतुक केलंय. म​हिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी करोना संकटामुळे देशातील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना व्हेंटिलेटर्स बनवण्यापासून, Mahindra Holidays चे रिसॉर्ट्स देण्यासह स्वतःचं १०० टक्के वेतनही मदत म्हणून देणार आणि करोनामुळे फटका बसलेल्या छोट्या उद्योजकांच्या मदतीसाठी निधी उभारणार असल्याचं काल(दि.२२) ट्विटरवरुन जाहीर केलं. त्यानंतर थरुर यांनी, देशाच्या व्यवसाय क्षेत्राला महिंद्रा यांच्यासारख्याच दूरदृष्टी-नि: स्वार्थी नेतृत्वाची गरज असल्याचं म्हणत त्यांचं कौतुक केलंय.

“मी आनंद महिंद्रांना ते किशोरवयीन असताना हार्वर्डमध्ये शिक्षण घेत होते तेव्हापासून ओळखतो…पण हे ट्विट वाचण्याआधी मला त्यांचा इतका अभिमान कधीही वाटला नव्हता तेव्हा…आपल्या देशाला व्यवसाय क्षेत्रासह, जीवनातही अशाच दूरदृष्टी नि: स्वार्थी नेतृत्वाची गरज आहे. शाबाश!….”अशा आशयाचं ट्विट थरुर यांनी केलं आहे.

(कौतुकास्पद! करोना संकटावर मात करण्यासाठी महिंद्रांचा पुढाकार, घेतला मोठा निर्णय)

यापूर्वी महिंद्रा यांनी रविवारी एकापाठोपाठ पाच ट्विट करुन , “तज्ज्ञांनुसार भारत करोना संकटाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचलाय किंवा तिसऱ्या टप्प्याच्या अगदी दारात उभा आहे…त्यामुळे करोनाग्रस्तांच्या संख्येत काही पटीने वाढ होण्याची शक्यता आहे…काही आठवडे लॉकडाउन हाच उत्तम पर्याय आहे…त्यामुळे वैद्यकीय सेवेवरील दबावही थोडा कमी होईल. पण, आपल्याला अजून बरीच तात्पुरती रुग्णालये तयार करण्याची आवश्यकता आहे आणि आपल्याकडे व्हेंटिलेटरची कमतरता आहे…. त्यामुळे आमच्या उत्पादन सुविधांद्वारे ( manufacturing facilities)व्हेंटिलेटर्स बनवण्यासाठी काय करावं लागेल यावर महिंद्रा ग्रुप तातडीने काम सुरु करेल… आम्ही तात्पुरती काळजी सुविधा केंद्र म्हणून आमच्या महिंद्रा हॉलिडेजचे रिसॉर्ट्स ऑफर करण्यास तयार आहोत…आमची प्रोजेक्ट टीम तात्पुरती काळजी सुविधा केंद्र उभारण्यात शासन / सैन्यदलास मदत करण्यास तयार आहे…तसेच आम्ही करोनामुळे फटका बसलेल्या छोट्या उद्योजकांच्या मदतीसाठी निधी उभारणार असून, त्यात मी माझे १०० टक्के वेतन मदत म्हणून देईल, तसेच आम्ही आमच्या सहयोगींनाही या निधीमध्ये स्वेच्छेने योगदान देण्यास प्रोत्साहित करू” असे जाहीर केले आहे.