16 October 2019

News Flash

प्रत्येक नवऱ्यानं बघायला हवा शिखर धवनचा ‘हा’ व्हिडीयो

व्हिडीओसोबत आपलं मतही व्यक्त केलं आहे

उत्तम बाँडींगने नाते अधिक मजबूत होते. यासाठी एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी व्हावे लागते. प्रत्येक कामात पार्टनरला मदत करणे, जबाबदारी वाटून घेतल्याने नाते मजबूत होते. घरातील कामांना दुय्यम मानणाऱ्या पुरुषांनी शिखर धवनचा हा व्हिडीओ एकदा नक्की पाहावा.

भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज शिखर धवन सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव असतो. पत्नी आयेशा आणि मुलांसोबतचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना त्याला आपण पाहतो. आज बुधवारी शिखरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये शिखर धवन घरातील साफ-सफाई करताना दिसतोय. ‘घरातील कामं करण्याची जबाबदारी फक्त एका व्यक्तीची नाही, कारण घर दोघांचे आहे. घरातील साफसफाई करण्यासोबतच जेवणही तयार करतो. जेवण तेवढं चवदार नसते मात्र प्रयत्न करत असतो.  तुम्हीही घरांमध्ये पत्नीला मदत करा. कारण घर सांभाळण्याची जबाबदारी जेवढी पत्नीची आहे तेवढीच तुमचीही. एकदा तरी आपल्या बायकोला कामात मदत करुन पहा तुम्हाला आनंद वाटेल, असे या व्हिडीओमध्ये शिखर धवन म्हणतोय.’

शिखर धवनने व्हिडीओवर पोस्ट करताना त्यासोबत आपलं मतही व्यक्त केलं आहे.  त्या ओळीतून शिखर धवनचे आपल्या पत्नीप्रति असलेले प्रेम आणि आदर दिसून येतो. ‘आतपर्यंतच्या माझ्या सर्वोत्कृष्ट भागिदारापैकी एक माझी पत्नी आयेशा आहे. कारण, मुलांच्या संगोपनापासून ते घर साफ करण्यापर्यंत अशा प्रत्येक गोष्टीमध्ये दोघांचाही सहभाग असतो.’ शिखर धवनच्या या व्हिडीओला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. ४९ सेंकदाच्या या व्हिडीओला काही मिनीटांमध्ये तीन हजारपेक्षा जास्त चाहत्यांनी पाहिले आहे. शिखर धवनला सोशल मीडियावर कौतुकाची थाप पडत आहे.

दरम्यान, खराब फॉर्ममुळे शिखर धवन भारतीय कसोटी संघातून बाहेर आहे. पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलियाविरोधात सुरू होणाऱ्या वन-डे मालिकेआधी शिखर भारतीय संघासोबत जोडला जाईल. सध्या शिखर धवन ऑस्ट्रेलियामध्ये पत्नी आणि मुलांना देत आहे.

First Published on January 2, 2019 6:01 pm

Web Title: shikhar dhawan cleaning in house