ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करुन जायबंदी झालेल्या सलामीवीर शिखर धवनच्या अंगठ्याला प्लास्टर घालण्यात आले आहे. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर एक उसळता चेंडू अंगठ्यावर आदळल्याने संघाबाहेर गेलेला धवन कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरोधातील सामन्यालाही मुकणार आहे. मात्र, भारत-पाकिस्तान सामन्यात खेळणार नसला तरी मैदानाबाहेरुन धवनचा ‘खेळ’ सुरू आहे. आज(दि.16) अर्थात भारत पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच ‘फादर्स डे’ असल्याने धवनने ट्विटरद्वारे फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण, त्यासोबतच त्याने अप्रत्यक्षपणे पाकिस्तानी संघावर आणि चाहत्यांवरही निशाणा साधला आहे.

गौरव कपूर याच्या सोबत झालेल्या #BreakfastWithChampions या यु-ट्यूबरील कार्यक्रमाच्या व्हिडिओचा एक भाग धवनने ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये धवनसोबत रोहित शर्मा आणि धवनचा मुलगा झोरावर हा देखील आहे. गौरव कपूर झोरावरला, तू चांगला फलंदाज आहेस की तुझे वडील असा प्रश्न विचारतो त्यावर झोरावर दोघांपैकी कुणाचं नाव घेण्याऐवजी रोहित शर्माकडे बोट दाखवतो. ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा देताना भारत-पाक सामन्याला काहीच तास शिल्लक असताना धवनने या व्हिडिओसोबत ‘बाप शेर तो बेटा सवा शेर’ असं ट्विट केलं आहे, यासोबत इमोजीचाही वापर केला आहे. सोशल मीडियावर सध्या भारत पाकिस्तान सामन्याबाबत कोण कोणाचा बाप ही चर्चा सर्वत्र असताना धवनने केलेल्या ट्विटमुळे त्याने पाकिस्तानी संघ आणि पाकिस्तानी चाहत्यांनाच लक्ष्य केल्याची चर्चा आहे.

दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली शिखर धवनजच्या तब्येतीबद्दल आशावादी आहे. शिखर सध्या दुखापतीमधून सावरत असून येत्या १०-१२ दिवसात तो पुनरागमन करेल असं विराटने यापूर्वी म्हटलं आहे. “त्याच्या अंगठ्याला प्लास्टर करण्यात आले आहे आणि पुढीत काही दिवस ते तसेच ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्या दुखापतीची चिकित्सा करण्यात येईल. आशा करतो की तो साखळी फेरीच्या मध्यंतराच्या सत्रात पुनरागमन करेल आणि उपांत्य फेरीचा सामनाही खेळेल’, असा विराट म्हणाला आहे .