सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेवर आपली चर्चा झाली नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं. तसंच सत्तास्थापनेचं काय करायचं ते भाजपा आणि शिवसेना पाहून घेतील असंही ते म्हणाले होते.

त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. तसंच त्यानंतर नेटकऱ्यांनीही शिवसेनेला चांगलंच ट्रोल केलं आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे काही मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही जणांनी तर शरद पवार यांनी संजय राऊत आणि शिवसेनेला फसवल्याचं म्हटलं आहे. तर काही एकानं शिवसेनेसोबत शरद पवार यांनी प्रँक केल्याचं मिम ट्विट केलं आहे.

मंगळवारी सकाळी खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. तसंच शरद पवार हे काहीही चुकीचं बोलले नसल्याचं म्हटलं. राज्यात शिवसेनेच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल आणि तेही शिवसेनेच्याच नेतृत्वात होईल, म्हणूनत पवार असं म्हणाले असल्याचं राऊत यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात शरद पवार माझे गुरू. पवारांची खरी लढाई ही भाजपाशी आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्यांवरून भाजपानं काहीतरी शिकावं असा सल्लाही त्यांनी दिला होता.