माणसानंतर जर कोणता प्राणी हुशार असेल तर तो म्हणजे माकड. एक माकड असूनही तो अनेक गोष्टी शिताफीने करत असतो. मात्र कधी-कधी त्यांच्या माकडचाळ्यांमुळे अनेकांना नुकसानही सहन करावं लागतं. डोंगरकडांवर आढळून येणारी ही माकडं ज्यावेळी मानववस्तीमध्ये येतात त्यावेळी त्यांचा हौदोस पाहण्यासारखा असतो. एकतर मानववस्तीत आल्यामुळे येथील लोक मारतील ही भीती त्यांच्या मनात असते, तर दुसरीकडे प्रत्येक गोष्टीचं कुतूहल असतं. या साऱ्यातून त्यांच्याकडून अनेक गोष्टींचं नुकसान होतं. कर्नाटकामध्ये अशाच काही माकडांनी एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये धुडगूस घातला होता. मात्र या माकडांना पळवून लावण्यासाठी शेतकऱ्याने जी शक्कल लढवली आहे ती पाहून अनेकांना हसू अनावर झालं आहे.

कर्नाटकमधील नालुरु गावात राहणाऱ्या श्रीकांता गौडा यांच्या शेतामध्ये काही माकडांनी प्रचंड धुडगूस घातला होता. त्यामुळे त्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं. प्रयत्न करुनही ही माकडं काही केल्या तेथून जात नव्हती. त्यामुळेच श्रीकांता यांनी एक शक्कल लढविली. त्यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्याला वाघाप्रमाणे रंग दिला. जेणेकरुन हा कुत्रा वाघ असल्याचा भास माकडांना होईल.

वाचा : महिलेने दिला ‘प्रेग्नंट बाळा’ला जन्म, डॉक्टरांनी जे केलं पाहून व्हाल थक्क

जवळपास ४ वर्षांपूर्वी श्रीकांता यांनी भटकळ जिल्ह्यामध्ये एका शेतामध्ये वाघाप्रमाणे एक बाहुली असल्याचं पाहिलं होतं. वाघाप्रमाणे दिसणारी बाहुली पाहिल्यानंतर तो खराखुरा वाघ असल्याचं माकडांना वाटायचं आणि ते भितीपोटी शेतात यायचे नाहीत. हीच शक्कल श्रीकांता यांनी त्यांचं शेत वाचविण्यासाठी केली. त्यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्याला वाघाप्रमाणे पिवळा रंग दिला आणि त्यावर काळ्या रंगाचे पट्टेदेखील ओढले. विशेष म्हणजे त्यांची ही कल्पना यशस्वी ठरली. या कुत्र्याला पाहून तो खरंच वाघ असल्याचं माकडांना वाटलं आणि त्यांनी शेतात येणं बंद करुन टाकलं.

वाचा : Video : लाइव्ह रिपोर्टिंग करताना मागे लागलं डुक्कर, स्टुडिओ अँकरलाही आलं हसू

दरम्यान, श्रीकांता यांनी कुत्र्याला कोणतीही इजा होऊ नये यासाठी डायचा वापर केला होता. त्यामुळे हा रंग महिन्याभरामध्ये उतरु लागला. त्यामुळे पुन्हा माकडं येतील या भीतीने श्रीकांता यांनी कुत्र्याचे फोटो काढून ते शेतात ठिकठिकाणी लावले आहेत. सध्या वाघ झालेल्या कुत्र्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून शेतकऱ्याच्या या युक्तीची प्रशंसा करण्यात येत आहे.