मंगळवारचा दिवस उजाडला तोच खूशखबर घेऊन. अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला आणि क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाची लाट उसळली. सोशल मीडियावर या बातमीचे पडसाद उमटले नसते तरच नवल. कल्पक नेटिझन्सनी या सामन्याचं विश्लेषण खास आपल्या पद्धतीनं करायला सुरूवात केली. त्यामधलं एक निरीक्षण तर फारच चपखल आहे. ते म्हणजे पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला 19 धावा करता आलेल्या नाहीत.

रौहेल नाझिर हा सगळ्यात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला परंतु त्याच्या एकूण धावा आहेत 18. तर त्या खालोखाल धावा केल्या आहेत साद खाननं 15. पाकिस्तानचा डाव 69 मध्ये गडगडला आणि 272 धावा केलेल्या भारतानं पाकिस्तानचा तब्बल 203 धावांनी धुव्वा उडवला. त्यामुळं पाकिस्तान खरोखर अंडर – 19 या शब्दाला जागला आणि त्यांच्या एकाही फलंदाजानं 19 धावांचा पल्ला गाठला नाही असं वि़डंबन सोशल व्हायरल झालं आहे.

भारताचा फलंदाज पृथ्वी शॉ आणि आणि मनोज कैरा यांनी चांगली सुरूवात करून दिली मात्र त्यावर चांद चढवला शुभमन गिलनं. त्यानं 148 चेंडूंमध्ये 102 धावा फटकावल्या आणि भारताला 272 धावांची मजबूत धावसंख्या उभारून दिली.

भारताच्या या आव्हानापुढे पाकिस्ताननं प्रथमपासूनच शरणागती पत्करली होती, कारण भारताची वेगवान गोलंदाजी त्यांना खेळतादेखील येत नव्हती.

140 किमी. प्रती तास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी टाकणारा नागरकोटी असो किंवा 4 षटकात 6 धावा देणारा मावी असो पाकच्या फलंदाजांना खेळताच येत नव्हतं. मात्र गोलंदाजीमध्ये दिवस गाजवला ईशांत पोरेलनं. त्यानं अवघ्या 17 धावा घेत चार फलंदाजांना तंबूत धाडलं आणि भारताचा विजय सुकर केला.