आईविना मुल वाढवणं, त्याला संभाळणं, समजून घेणं, आईची कमी भासू नये म्हणून त्याच्यासाठी सतत धडपडत राहणं ही नक्कीच एका वडिलांसाठी साधी गोष्ट नाही. मुलांचं संगोपन करताना अशा अनेक अडचणी एकल पालकत्त्व स्वीकारणाऱ्या पुरुषांना येतात. पण, तरीही मोठ्या निष्ठेने आणि आईच्या मायेनं वडील आपल्या मुलांची काळजी घेत असतात.

सध्या सोशल मीडियावर एक छोटासा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जगातील अनेक देशांत मे महिन्यांत मदर्स डे साजरा होत असला तरी थायलंडमध्ये १२ ऑगस्ट हा दिवस मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. यानिमित्तानं अनेक शाळांत कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मुलं आपल्या आईला घेऊन शाळेत येतात या दिवसांचा आनंद लुटतात. मात्र ५ वर्षांच्या ओझेनला आई नाही. त्याचे वडील सॅम त्याचं संगोपन करतात.

दरवर्षी मुलं आपल्या आईला घेऊन शाळेत येतात मात्र ओझेनला यावेळी आपल्या आईची कमतरता भासू नये म्हणून त्यांचे वडील महिलांसारखे कपडे परिधान करून त्याच्या शाळेत पोहोचले. आई नसली तरी बाबांना पाहून छोट्या ओझेनच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या भावनिक क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.