जून महिन्यात थायलंडमधल्या चियांग राय प्रांतातील थांम लुआंग नांग नोन गुहेत थाय फुटबॉल संघाची टीम तब्बल दोन आठवड्याहून अधिक काळ अडकून होती. या संघात ११ ते १६ वयोगटातील लहान मुलं आणि त्यांचा २५ वर्षांचा प्रशिक्षकही होता. या मुलांच्या सुखरुप सुटकेसाठी जगभरातील लोकांनी प्रार्थना केल्या, त्यांच्या सुटकेचा प्रयत्न करणाऱ्या एका कमांडोला आपले प्राणही गमवावे लागले होते. अखेर जगभरातील तज्ज्ञ, जाणकार, सील कमांडो यांच्या प्रयत्नानंतर गुहेत अडकलेल्या १३ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली.

या घटनेला ५ महिन्यांहूनही अधिक काळ उलटला असेल. या पाच महिन्यात या मुलांच्या आयुष्यात बऱ्याच नाट्यपूर्ण घटना घडल्या. मृत्यूच्या दाढेतून परतेली ही मुलं सेलिब्रिटी झाली. अनेक मोठ्या लोकांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. या लहानग्यांच्या फुटबॉल टीमला आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देण्याची तयारीही काही प्रसिद्ध कोचनं दाखवली. एकीकडे लहान मुलांचं आयुष्य पूर्णपणे बदललं तर दुसरीकडे या गुहा परिसरात राहणाऱ्या लोकांच्याही आयुष्यात बदल झाले. ही गुहा आता पर्यटन स्थळ म्हणून जगभरात लोकप्रिय झाली आहे.

याआधीही थांम लुआंग नांग नोन गुहा पर्यटकांमध्ये प्रसिद्ध होती. मात्र त्याठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या खूपच कमी होती. पण त्या घटनेपासून येथे पर्यटकांना राबता खूपच वाढला आहे. एका आंतरराष्ट्रीय संकेत स्थळाच्या माहितीनुसार दरदिवशी या गुहेला भेट देणाऱ्यांची संख्या ही जवळपास १६ हजारांच्या घरात जाते. इथल्या स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहे. गुहेच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी जवळपास १०० हून अधिक छोटी दुकानं सुरू झाली आहे. जिथे स्थानिक आपल्या शेतात पिकणाऱ्या फळं, भाज्यांची विक्री करतात तसेच येणाऱ्या इतर पर्यटकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थाही करतात.