थायलंडमधील प्रमुख उद्योग व्यवसायांमध्ये नारळापासून दूध काढण्याच्या उद्योगाचा समावेश होतो. नारळापासून दूध निर्मिती करणारा थायलंड हा जगातील सर्वात प्रमुख देशांपैकी एक आहे. मात्र आता हा उद्योग अडचणीमध्ये सापडला आहे. यामागील कारणही अगदी विचित्र आहे. झाडावरुन नारळ काढण्यासाठी थायलंडमध्ये शिकवलेल्या माकडांची मदत घेतली जाते. मात्र आता या उद्योगामध्ये आणि नारळाशी संबंधित उद्योगांमध्ये माकडांना राबवून घेण्यास युरोपबरोबरच जगभरातील वेगवेगळ्या भागांमधील प्राणी मित्रांनी विरोध केला आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या पेटा या संस्थेनेही माकडांचा असा वापर करण्याला विरोध केला आहे. त्यामुळे आता हा ४० कोटी डॉलर (अंदाजे तीन हजार कोटींचा) उद्योग संकटात सापडला आहे.

पेटाचं म्हणणं काय?

नारळापासून दूध बनवण्याचा उद्योग मुख्यपणे माकडांवर अवलंबून आहे. नारळाच्या झाडावर चढून पटापट नारळ तोडून ते सुरक्षितपणे खाली आणण्यासाठी माकडांना विशेष प्रशिक्षण दिलं जातं. मात्र या माकडांबरोबर हिंसा केली जाते असं आरोप पेटाने केला आहे. या माकडांकडून एखाद्या यंत्राप्रमाणे काम करवून घेतलं जातं असं पेटाचं म्हणणं आहे. तसेच त्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली जात नाही असाही आरोप पेटाने केला आहे. या माकडांना विश्रांती न देता अनेक तास त्यांच्याकडून काम करुन घेतलं जात असल्याचा आरोपही पेटाने केला आहे.

नक्की पाहा >> कोणी म्हणतं ब्लॅक ब्यूटी तर कोणी बगीरा… खरोखरच या फोटोंवरुन तुमची नजर हटणारच नाही

ब्रिटनमधील सुपरमार्केट्सने घातली बंदी

थायलंडमधील या नारळापासून दूध काढण्याच्या उद्योगात माकडांचा वापर करण्याला जगभरामधून  विरोध होत असल्याचे पेटाच्या अहवालात म्हटलं आहे. ब्रिटनमधील अनेक सुपर मार्केटने थायलंडमधून आलेल्या नारळाच्या उत्पादनांची विक्री बंद केली आहे. थायलंडमधील या व्यवसायाशी संबंधित एका जाणकार व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्येही थायलंडमधून आयात करण्यात येणाऱ्या नारळाच्या उत्पादनांशी संबंधित प्राणी हिंसेचा तपास करण्यास सुरुवात केली आहे.

ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या पार्टनरचाही विरोध

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची पार्टनर, कॅरी सायमंड्स यांनीही याविरोधात आवाज उठवला आहे. दुकानांमध्ये माकडांच्या मदतीने उत्पादने विकणाऱ्यांवर बहिष्कार घालायला हवा असं कॅरी यांनी ट्विटवरुन म्हटलं आहे.

नक्की वाचा >यन्ना रास्कला माइंड इट… केसांचा भांग पाडणारी फॅशनेबल हत्तीण ठरतेय चर्चेचा विषय

आता पुढे काय ?

या उद्योगाला संकटामधून सावरण्यासाठी थायलंड सरकारमधील अनेक मोठे अधिकारी आणि नारळ उद्योगाशी संबंधित व्यापारी तसेच अर्थमंत्र्यांनी बुधवारी या विषयावर एक बैठक घेतली. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार नारळाच्या उत्पादनांवर स्पष्ट शब्दांमध्ये हे उत्पादन घेताना माकडांचा वापर करण्यात आला नाही असं लिहिण्यात यावं यावर सर्वांचे एकमत झालं आहे.