सोशल नेटवर्किंगवर सध्या एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे. सामान्यपणे इंटरनेटवर जंगलामधील भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असतात. जंगलामध्ये अनेक अद्भूत गोष्टी घडत असतात. जंगलात जिवंत राहण्यासाठी रोज मृत्यूशी झुंज द्यावी लागते. तर कधी या जंगली प्राण्यांच्या थक्क करणाऱ्या कसरती आपल्याला आश्चर्यचकित करतात. कधीतरी जंगलामधील हा थरार कॅमेरामध्ये रेकॉर्ड होतो आणि त्याची चर्चा होते. असाच एक व्हिडिओ पहिल्यांदाच कॅमेरात कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये बर्फाळ प्रदेशाती बिबट्या म्हणजेच स्नो लेपर्ड शिकार करण्यासाठी चक्क दरीमध्ये उडी मारताना दिसत आहे.

इंडियन फॉरेस्ट सर्विसमधील आधिकारी प्रवीण कासवान यांनी ट्विटरवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. दोन मिनिटं २० सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये शिकार करताना बिबट्या अगदी स्वत:ला झोकून देताना अनेक फूट खोल दरीमध्ये पडताना दिसत आहे. मात्र एवढ्या खोल दरीमध्ये पडल्यानंतरी हतो शिकार केलेल्या प्राण्यावरील पकड सोडत नाही हे विशेष.  “ज्यांना डोंगराळ भागातील भूत म्हणून ओळखलं जातं अशा स्नो लेपर्डमध्ये असणारी ही ताकद आणि चपळता पाहा. हे फुटेज मॉर्डीन डोहरनने शूट केलं आहे. मंगोलियामधील गोबी येथील वाळवंटाच्या किनारी हे शूट करण्यात आलं आहे,” अशी कॅप्शन प्रवीण यांनी दिली आहे.

या व्हिडिओत बिबट्याची मादी शिकार करताना थेट दरीत पडते. मात्र त्यानंतरही बर्फावरुन घसरत जाताना शेपटीच्या सहाय्याने आपल्या शरीराचे संतुलन कायम राखण्याचा प्रयत्न करताना ती दिसते. एवढ्या सर्व गोंधळातही ती गडबडलेल्या अवस्थेत दिसत नाही. त्यामुळेच ती शिकार केलेल्या प्राण्यावरील पकडही सोडत नाही. अखेर खाली आल्यावर ती पुन्हा आपली शिकार पंजामध्ये पकडताना दिसते. हा व्हिडिओ दोन हजार ३०० हून अधिक जणांनी रिट्विट केला आहे. तर जवळजवळ दीड लाख व्ह्यूज या व्हिडिओ आहेत.

हा व्हिडिओ सिक्रेट लाइव्हज ऑफ स्नो लेपर्ड या माहितीपटामधील असल्याचे प्रवीण यांनी अन्य एका ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे.