सौदी अरेबियाचा अर्ध्याधिक भाग हा वाळवंटाने व्यापला आहे. तळपत्या सूर्यात अंगाची लाही लाही होते. अशात सौदी अरेबियाचा नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसणारी गोष्ट घडली, कारण या वाळवंटात बर्फवृष्टी झाली अन् सारे नागरिक सुखावले आहेत.

वाचा : जैवविविधतेचा खजिना असलेली ‘ग्रेट बॅरियर रीफ’ मृत ?

गेल्या वर्षभरात सौदी अरेबियाला निसर्गाकडून हा दुसरा मोठा धक्का आहे. गेल्याच वर्षात सौदी अरेबियात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली होती आणि पर्जन्यमान अत्यंत कमी असलेल्या या देशात गुडघाभर पाणी साचले होते. यात जवळपास १८ जणांचा जीव गेला होता. यातच मंगळवारपासूनच देशातील अनेक भागातील तापमान हे अचानक शून्य अंशावर जाऊन पोहचले आहे. अनेक ठिकाणी तर हे तापमान शून्याहून कमी आहे. त्यामुळे येथील अनेक भागात मंगळवारापासूनच जोरदार बर्फवृष्टीला सुरूवात झाली आहे. वाळवंटात झालेली ही बर्फवृष्टी पाहून सौदीच्या नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नोव्हेंबरच्या आसपास येथील तापमान हे २० अंश सेल्शिअसच्या आसपास असते. या बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर आले असून अनेकांनी याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले आहेत. वाढते प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, हवामानातील बदल यामुळे अनेक ठिकाणच्या वातावरणात असा फरक दिसत आहे. सौदी अरेबियामध्ये झालेले ही बर्फवृष्टी पर्यवरणासाठी धोक्याचा इशारा असला तरी तुर्तास मात्र या दुर्मिळ योगाचा सौदी जनता आनंद लुटत आहे.

काही दिवसांपूर्वी सैबेरियाच्या १८ किलोमीटर लांब किनारपट्टीवर जवळपास फुटबॉलच्या आकाराएवढ्या गारा आढळल्या होत्या. आतापर्यंत कुठेच इतक्या मोठ्या आकाराच्या गारा सापडल्या नसल्याने सगळेच हैराण झाले आहेत. याचे काही फोटोही सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहेत. हे गोळे तयार कसे झाले याबाबत काही प्रश्न अनुत्तरित आहेत. पण बर्फांचे छोटे गोळे वा-यासोबत वाहून एकत्र आल्याने एवढ्या मोठ्या आकाराचे गोळे तयार झाल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली होती.