समाजमाध्यमांवरून प्रसारित होणाऱ्या खोटय़ा बातम्यांमध्ये भाजपची प्रौढी मिरवणाऱ्या किंवा विरोधी पक्षांच्या नेत्यांची चेष्टा वा टीका करणाऱ्या बातम्यांचा समावेश जास्त असतो, ही गोष्ट लपून राहिलेली नाही. मात्र, असत्य पसरवण्यात अन्य राजकीय पक्षही मागे नाहीत. फेसबुकवरील ‘आय सपोर्ट राहुल गांधी’ या फॅन पेजवरून नुकतीच एक बातमी प्रसारित करण्यात आली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सातव्या क्रमांकाचे भ्रष्ट पंतप्रधान ठरले आहेत’ असा दावा त्यात केला आहे. ‘बीबीसीच्या न्यूज हब’ने केलेल्या सर्वेक्षणाचा हवालाही त्यात दिला आहे. ‘मोदी हे आपल्या सत्तास्थानाचा वापर करून स्वत:चे उद्योग चालवत असून देशाच्या संसाधनांचा वापर करून त्यांनी अब्जावधी कमवले आहेत,’ असे या बातमीत म्हटले आहे. ही पोस्ट सुमारे पाच हजार शेअर करण्यात आली. हे पेज काँग्रेसचे अधिकृत फेसबुक पेज नाही. प्रत्यक्षात ‘बीबीसी न्यूज हब’ने असे सर्वेक्षण केले नसल्याचे व या संकेतस्थळाचाही बीबीसीशी संबंध नसल्याचेही उघड झाले. काही महिन्यांपूर्वी असेच सर्वेक्षण काँग्रेसच्या विरोधात प्रसारित करण्यात येत होते.