X
Advertisement

“चक्रीवादळ गुजरातला पळविण्याचा मोदी-शहांचा डाव, संजय राऊत चक्रीवादळाला मुंबईतच अडवणार”

महाराष्ट्रातील खासदाराची पोस्ट चर्चेत

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते वादळ गुजरातकडे मार्गक्रमण करत आहे. या वादळाने अतिरौद्रवतार धारण केलाय. रविवार सायंकाळपासूनच या वादळाचं स्वरुप तीव्र होताना दिसून आलं. सोमवार सकाळपासून महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये या वादळामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार चक्रीवादळाने अतिरौद्र रूप धारण केले असून, वेगवान होत ते गुजरात किनारपट्टीच्या दिशेने निघाले आहे. वादळामुळे ताशी १८० ते १९० किमी वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वादळामुळे मुंबईसह शेजारील जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस सुरू आहे. एकीकडे खरोखर पाऊस सुरु असतानाच सोशल नेटवर्किंगवरही या वादळासंदर्भात जोरदार चर्चा आहे. अनेक फोटो, व्हिडीओंबरोबरच यंदाही वादळाच्या गंभीर परिस्थितीही हलके पुलके विनोद आणि मिम्सही शेअर केले जात आहेत. जळगावचे भाजपा खासदार उमेश पाटील यांनीही अशाच प्रकारचा एक व्हायरल मेसेज सोशल नेटवर्किंगवर शेअर करत तौक्ते वादळावरुन शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

चक्रीवादळ गुजरातला पळविण्याचा मोदी-शहांचा डाव असून संजय राऊत चक्रीवादळाला मुंबईतच अडवणार आहेत, असं ट्विट पाटील यांनी केलं आहे. हा विनोद काल सायंकाळपासूनच सोशल मीडियावर चर्चेत आहे. मात्र पाटील यांनी आपल्या ट्विटरच्या व्हेरिफाइड अकाऊंटवरुन ट्विट करत राऊतांना टोला लगावलाय.

दरम्यान, रविवारी या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्रासह गोवा, केरळ आदी भागाला जोरदार तडाखा बसला आहे. आज (१७ मे) मुंबई परिसर, ठाणे, पालघर आणि रायगड या भागांवर चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण भागांत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली असून सकाळपासूनच मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस पडतोय. चक्रीवादळाचा परिणाम म्हणून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागांमध्ये शनिवारपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला केरळ, कर्नाटक राज्यांमध्ये या चक्रीवादळाचा फटका बसला. रविवारी सकाळी चक्रीवादळ अतितीव्र होऊन त्याचा वेगही वाढला. समुद्रामध्ये सध्या ताशी सुमारे १७० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. रविवारी संध्याकाळपर्यंत वेगाने चक्रीवादळ पुढे सरकत होते.

जोरदार पाऊस आणि झाडं उन्मळून पडल्याचे प्रकार

गोव्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असताना या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. पुढे ते दक्षिण कोकण किनारपट्टीजवळ सरकले. त्यामुळे या भागात सोसाटय़ाच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला होता. याच कालावधीत कोल्हा पूर आणि सांगली परिसरातही चक्रीवादळाचा परिणाम जाणवला. या भागातही जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूकही विस्कळीत झाली. बहुतांश भागांत विजेचे खांब कोसळले, त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. पश्चिम घाट परिसरात सर्वदूर वादळी वारा आणि जोरदार पाऊस झाला.

मुंबईला धडकणार नाही गुजरातकडे जाणार…

अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळ मुंबईला धडकणार नसले तरी समुद्रातून गुजरातकडे सरकणाऱ्या या वादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्य़ांतही अतिमुसळधार पाऊस आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. मुंबई, ठाणे जिल्ह्य़ासाठी सोमवारी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पालघर येथेही सोमवार आणि मंगळवारी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्य़ांमध्ये सोमवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर सोसाटय़ाचे वारे वाहण्याचीही शक्यता आहे. या कालावधीत साधारण ७० ते ९० किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, नागरिकांनी घराबाहेर पडू नये, मच्छिमारांनीही समुद्रात जाऊ नये असे आवाहन हवामान विभाग आणि महापालिकेने केले आहे.

मुंबईत वातावरण बदल

या वादळाने शनिवार रात्रीपासूनच मुंबईतील वातावरण बदलून गेले. शनिवारी रात्री आणि रविवारीही मुंबईतील अनेक भागांत पावसाच्या सरींनी हजेरी लावली. हवामान विभागाच्या सांताक्रुझ केंद्राने २८.८ अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्राने २८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली होती. मात्र, रविवारी पावसाच्या सरींमुळे किमान आणि कमाल तापमानातही काहिशी घट झाली. रविवारी सांताक्रुझ केंद्राने २६.४ अंश सेल्सिअस किमान तर ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद केली. कुलाबा केंद्राने २७.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची तर ३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली.

23
READ IN APP
X