विविध मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज मध्यारात्रीपासून संप पुकारल्याने मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले आहेत. अनेक रेल्वे स्थानकांबाहेर आज टॅक्सीसाठी प्रवाश्यांचा लांबच लांब रांगा दिसून आल्या. तर दुसरीकडे बेस्टच्या डेपोमधून एकही बस बाहेर काढण्यात आली नाही. त्यामुळेच आज अनेकांना ऑफिसला जायला उशीर झाला. एकीकडे हा सगळा गोंधळ सुरु असतानाच नेटवर जपानमधील अशाच बस सेवा संपाची चर्चा होताना दिसत आहे. प्रवाशांना नाहक त्रास देण्याऐवजी प्रशासनाला दणका देत तेथील बस चालकांनी संप केला होता.

मागील वर्षी जपानमध्ये आपल्या मागण्यांसाठी तेथील बस चालकांनी आगळ्यावेगळ्या प्रकारे संप केला. बसमध्ये चढल्यानंतर दरवाजातच चालकांकडून तिकीट दिले जाते त्या मशिन या चालकांनी बंद करुन त्या गोधड्यांखाली झाकून ठेवल्या. बस रस्त्यावर न उतरवण्याऐवजी त्यांनी प्रवाशांची सोय लक्षात घेत बस सुरु ठेवल्या पण त्यासाठी तिकीट दर न आकारता सर्वांना मोफतच नियोजित ठिकाणी पोहचवले. यामुळे एका दगडात दोन पक्षी मेले अशी स्थिती झाली. पहिले म्हणजे प्रवाशांची गैरसोय झाली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे बस चालवणाऱ्या कंपन्यांना चालकांना दोष देता आला नाही. या चालकांनी बस चालवण्यास नकार दिला असता तर कंपन्यांनी या चालकांना स्वत:च्या मागण्या जास्त महत्वाच्या असून त्यांनी प्रवाशांची काळजी नाही असा प्रचार केला असता. म्हणूनच चालकांनी बस बंद न ठेवता त्यांनी नेहमीप्रमाणे बस सेवा सुरुच ठेवली पण मोफत.

केवळ जपानमध्येच अशाप्रकारे संप झाला आहे असं नाही तर दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातील ब्रिसबेन आणि सिडनी या दोन शहरांमधील बस चालकांनाही प्रवाशांकडून पैसे न घेता त्यांना मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करुन दिली होती. त्यामुळेच बेस्टच्या कर्मचाऱ्यांनीही या अशा प्रवाशांची गैरसोय टाळणाऱ्या संपांकडून शिकावे असं मत नेटकरी व्यक्त करताना दिसत आहेत.