माढा तालुक्यातील अकोले ( बु) येथील एका शेतकऱ्याला करोनाचा संसर्ग झाल्यानंतर दक्षेतसाठी त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तींना प्रशासनानं ताब्यात घेऊन रुग्णालयात क्वारंटाइन केलं. त्यामुळे घरात कोणीही नसल्यामुळे वस्तीवरील जनावारं चारापाण्या अभावी उपाशी मरत होती. गावातील एकही व्यक्ती त्या मुक्या जनावरांना चारापाणी घालण्यासाठी पुढे येईना. अशातच खाकीतली माणुसकी जागी झाली. टेंभुर्णी पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी याची दखल घेत त्या शेतकऱ्याच्या घरी पोहचले.

सोलापूर ग्रामिण पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या टेंभुर्णी पोलिस स्टेशनमधील पोलिसांनी अकोले ( बु) येथील त्या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चारापाण्याची सोय केली. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. टेंभुर्णी पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनीही ट्विट करत त्या पोलिसांचं कौतुक केलं आहे.

माढा तालुक्यातील अकोले ( बु) येथील एका व्यक्तीचा अकलूज येथे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या व्यक्तीवर पुणे येथे उपचार चालू होते. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी करण्यात आली. त्यानुसार या व्यक्तीचे वडील, पत्नी व नोकर यांनाही शासकीय यंत्रणेनं कोरोना चाचणी करण्यासाठी कुर्डुवाडी येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

माढा तालुक्यातील अकोले खुर्द येथे सापडलेल्या करोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती केले असून त्यांच्या घरी असलेल्या पाळीव प्राण्यांच्या चारा व पाण्याची व्यवस्था टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अजित उबाळे, पोलीस नाईक बालाजी घोळवे , पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद काटे, गणेश खोटे, होमगार्ड झेंडे करत आहेत. टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या सर्व संवेदनशील पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या माणूसकीचं मला कौतुक वाटतं. असं ट्विट गृह मंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.