प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाच्या परिभाषा नेहमीच वेगवेगळ्या असतात. कोणाला, कधी आणि कोणत्या वेळी आनंदाची चाहूल लागेल हे सांगता येत नाही. असंच काहीसं सैन्यदलात काम करणाऱ्या एका सैनिकासोबत घडलं आहे. मोहिमेवरुन घरी परतण्यासाठी म्हणून निघालेल्या या सैनिकाला विमातळावरच आपल्या मुलीचा जन्म होताना पाहायला मिळालं. या शूर बाबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या बराच व्हायरल होत असून त्याच्या चेहऱ्यावरचे भावच सर्वकाही सांगून जात आहेत.

‘सीएनएन’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ब्रूक्स लिंडसे हा मिसीसिपी नॅशनल गार्डच्या, दुसऱ्या बटालियनच्या ११४ व्या फिल्ड आर्टीलरी रेजिमेंटमध्ये कार्यरत आहे. तो मुळचा ब्रँडन येथे राहणार असल्याचं कळत आहे.

लिंडसेची गरोदर पत्नी पुढील साधारण एका आठवड्यापर्यंत ती प्रसूत होणार नव्हती. पण, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला त्याआधीच प्रसूत करण्यात आलं. ब्रूक्स त्यावेळी एल पॅसो येथे असणाऱ्या फोर्ट ब्लिसमध्ये होता. तेथून तो डलासमार्गे मिसीसिपीमध्ये येणं अपेक्षित होतं. एकिकडे लिंडसेच्या बाळाचा जन्म होणारच होता. पण, इथे मात्र विमानतळावर त्याला आणखीनच उशिर होणार होता. कारण, त्याचं विमान उशिराने येणार होतं. सहसा विमानतळावर उगाचच होणाऱ्या या दिरंगाईमुळे अनेकांची चिडचीड होते. पण, त्याच्या ब्रूकला फायदाच झाला. कारण, आपल्या मुलीचा जन्म त्याला ‘फेसटाईम’च्या माध्यमातून पाहता आला. विमान वेळेवर असतं तर कदाचित त्याला या क्षणांना मुकावं लागलं असतं.

वाचा : जेव्हा चहा विक्रेत्याने पहिल्यांदाच आपल्या मुलांना नेलं मॅकडोनल्डमध्ये

मुलीच्या जन्मानंतर काही तासांनी ब्रूक्स आपल्या पत्नी आणि मुलीपाशी गेला. पण, त्याआधी तो ज्या अनमोल क्षणांचा साक्षीदार झाला होता त्याचा आनंद शब्दांतून व्यक्त करता येणं शक्यच नाही. ब्रूकच्या चेहऱ्यावरील आनंद आणि भाव पाहून त्याच्या मनात नेमकं काय सुरु असेल याचा सहज अंदाज लावता येत आहे. मुख्य म्हणजे विमानतळावर असणाऱ्या सहप्रवाशांनी ब्रूक्सचा हा व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडियावर पोस्ट केला.

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओला अवघ्या काही दिवसांमध्येच लाखो व्ह्यूज मिळाले. तर अनेकांनी तो शेअरही केला. लिंडसेचा हा व्हिडिओ आणि त्याच्या आयुष्यात चिमुलकलीचं आगमन झाल्यामुळे थेट सोशल मीडियाच्या माध्यमातूनच तिच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.