आपलं मुलं परीक्षेत नापास झालं तर एखाद्या वडिलांनी जल्लोष केल्याचं तुम्ही ऐकलंय का? मुलं परीक्षेत नापास झालं की पालकांची प्रतिक्रिया काय असते हे आपल्याला वेगळं सांगायला नको. पण मध्य प्रदेशमध्ये राहणारे सुरेंद्र कुमार व्यास हे तमाम पालकांहून थोडे वेगळं आहेत. त्यांचा मुलगा दहावीच्या परीक्षेत नापास झाला. पण याचं दु:ख करत बसण्यापेक्षा किंवा मुलाला दोष देण्यापेक्षा त्यांनी वेगळ्या पद्धतीनं ही परिस्थिती हाताळली. यासाठी त्यांनी घरीच सर्वांना जंगी पार्टी दिली.

परीक्षेचं दडपण मुलांवर असतं, पालकांच्या अपेक्षांचंही ओझं मुलांवर असतं. अनेक मुलं यातून येणाऱ्या नैराश्यातून आत्महत्या करतात. पण मला मात्र माझ्या मुलाला प्रोत्साहित करायचं होतं. ही काही शेवटची परीक्षा नाही हे मला माझ्या मुलाला सांगायचं आहे. आयुष्यात बरंच काही तुला पाहायचं आहे. त्यामुळे परीक्षांपेक्षाही आयुष्य खूप वेगळं आहे हा विश्वास मला त्याला द्यायचा होता म्हणूनच मी तो नापास झाल्यावरही जंगी पार्टीचं आयोजन केलं असं सुरेंद्र टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

मध्यप्रदेश बोर्डाच्या दहावीचे निकाल नुकतेच लागले. सुरेंद्र यांचा मुलगा नापस झाला तरी त्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटून याचा आनंद केला. असं केल्यानं तो निराश न होता पुढच्या खेपेला मन लावून अभ्यास करेन, त्याच्यावर कोणताही ताण येणार नाही असा विश्वास त्यांना आहे. इतकंच नाही तर इतर पालकांनी देखील आपल्या मुलांवर परीक्षेच्या काळात दबाव न टाकता त्यांना समजून घेऊन प्रोत्सहन देण्याची विनंतही त्यांनी केली आहे.