बॉलिवूडचा सिनेमा ‘थ्री ईडियट्स’मध्ये अभिनेता आमिर खानने फुंशुक बांगडू हे पात्र साकारलं होतं. विविध युक्त्यांद्वारे दैंनदिन समस्यांवर सोपे उपाय शोधणाऱ्या लदाखच्या सोनम वांगचुक यांच्या जीवनावर आधारित हे पात्र आमिर खानने साकारलं होतं. त्याच सोनम वांगचुक यांनी देशसंरक्षणार्थ तत्पर असणाऱ्या भारतीय जवानांसाठी एक अनोखा अविष्कार साकारला आहे. त्यांनी भारतीय सैन्यांसाठी सौर तंबू तयार केले आहेत.


सोनम वांगचुक यांनी सौरऊर्जेवर आधारित सैन्य तंबू तयार केले आहेत जे एकावेळी भारतीय लष्कराच्या 10 जवानांना वापरता येतील आणि ते पूर्णपणे पोर्टेबल आहेत. तंबूत हिटरचा वापर करण्यात आला आहे, हा हिटर सौरऊर्जेने संचालित होतो. तंबूचे वजन ३० किलोपेक्षाही कमी आहे. तापमानाचा पारा उणे अंशांमध्ये पोहोचला तरीही जवानांना या तंबूत थंडीची जाणिव होणार नाही, अशी या तंबूची रचना आहे.

सोनम वांगचुक यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून या सौर तंबूचे फोटो शेअर केले आहेत. त्यात गलवान व्हॅलीमधील बाहेरचे आणि तंबूच्या आतील तापमान दर्शवताना ते दिसत आहेत. या तंबूंना ‘सोलर हिटेड मिलेटरी टेन्ट’ नाव देण्यात आले आहे. सोशल मीडियावर या तंबूचा एक फोटो शेअर करुन वांगचुक यांनी सांगितले की, उणे १४ डिग्री सेल्सियमध्येही या तंबूत आरामात राहता येते. प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा यांच्यासह अनेकांनी सोनम वांगचुक यांच्या कार्याचं कौतुक केलं असून त्यांचं काम हे इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचं म्हटलं आहे. या तंबूचे वजन केवळ 30 किलो असून त्यात तापमान नियंत्रित करण्याची सोय आहे. संपूर्णपणे देशी बनावटीचा हा सौरतंबू लडाखमध्ये भारतीय जवानांसाठी वापरल्यास उर्जेसाठी केरोसीनचा वापर टाळता येईल, त्यामुळे प्रदूषण बऱ्याच प्रमाणात नियंत्रित करता येईल असंही सोनम वांगचुक यांनी म्हटलंय.