३० हजार फुटांवर विमान, विमानात असलेले १४९ प्रवासी निर्धास्त प्रवासाला निघाले होते. अचानक विमानाच्या इंजिनमध्ये स्फोट झाला. साऱ्या प्रवाशांच्या जीवावर बेतलं होतं, या परिस्थितीत कोणाचेही प्राण वाचण्याची शक्यता अगदी शून्य होती. पण विमानात असलेल्या महिला पायलटच्या प्रसंगावधानतेनं सुदैवानं प्रवाशांचे प्राण वाचले. पण यात एका महिलेचा मात्र जखमी होऊन दुर्दैवी मृत्यू झाला.

साऊथवेस्ट एअरलाईन्सच्या विमानानं न्यूयॉर्कवरून उड्डाण घेतलं. ११ वाजता हे विमान विमानतळावरून निघालं. पण उड्डाण घेतल्यानंतर २० मिनिटांनी इंजिनमध्ये स्फोट झाला. यावेळी विमान जमिनीपासून ३० हजार फुटांवर उडत होते. विमानात १४९ प्रवासी आणि पाच कर्मचारी होती. यावेळी विमानाची एक खिडकी तुटली आणि खिडकी शेजारी बसलेली महिला खिडकीतून बाहेर फेकली जाणार होती. मोठ्या प्रयत्नानं तिला वाचवण्यात आलं, पण यात मात्र ती जखमी झाली दुर्दैवानं उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

या विमानाची वैमानिक टेमी जो शल्ट्स होती. टेमी अमेरिकन नौदलातील लढाऊ विमानाची वैमानिक होती. त्यामुळे अशी कठीण परिस्थिती तिनं मोठ्या कमालीनं हाताळली. तिनं विमानाचं फिलाडेल्फीयामध्ये एमर्जन्सी लँडिग केलं. तिनं दाखवलेल्या असमान्य धैर्यामुळे आणि संयमामुळे विमानातल्या सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. म्हणूनचं तिचं कौतुक होत आहे.