इंग्लंडमध्ये एका फुटबॉलच्या स्टेडियममध्ये दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा फोटो दिसला. करोना व्हायरसच्या धोक्यामुळे स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जात नाहीये. त्यामुळे स्टेडियमच्या सीटवर आयोजकांनी प्रेक्षकांऐवजी अनेक लोकांचे कट-आउट लावले होते. पण यामध्ये एक फोटो लादेनचाही होता.

लीड्स युनाइटेड (Leeds United) फुटबॉल क्लबने आपल्या संघाच्या चाहत्यांना स्वतःचे कट-आउट्स स्टेडियममध्ये लावण्याची ऑफर दिली होती. यासाठी 25 ब्रिटिश पाउंड आकारुन अर्ज भरुन घेण्यात आले होते. पण एका चाहत्याने क्लबसोबत ‘प्रँक’ केला आणि ओसामा बिन लादेनचा फोटो पाठवला, आयोजकांनीही तो फोटो तसाच सीटवर लावला.

हा फोटो थोड्यावेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला, आणि अनेक ट्विटर युजर्सच्या ही चूक लक्षात आली. नंतर ट्विटरवर लीड्स क्लबला अनेकांनी ट्रोल करण्यास सुरूवात केली आणि विविध प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने तर, मला लादेनच्या बाजूला बसायला जागा दिली त्याबद्दल लीड्स क्लबचे आभार असं ट्विट केलं.



सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाल्यानंतर फुटबॉल क्लबने अखेर लादेनचं कट-आउट हटवलं. तसेच, अशाप्रकारचे आक्षेपार्ह फोटो मैदानात दिसून नये यासाठी चाहते जे फोटो पाठवतील त्याची पडताळणी केली जाईल असंही क्लबकडून सांगण्यात आलं. हा सामना लीड्स आणि फुलहॅम या संघांमध्ये 27 जून रोजी Elland Road स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.