करोना व्हायरसबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी सॉफ्टवेअर कंपनी Infosys ने आपल्या एका कर्मचाऱ्याला कामावरुन काढून टाकलंय. कर्नाटक पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे.

मुजीब मोहम्मद असे या व्यक्तीचे नाव असून त्याने आपल्या फेसबुक अकाउंटवरुन आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये, “या…सगळ्यांनी एकत्र या…बाहेर निघा…आणि उघड्यावर शिंका व व्हायरस पसरवा”, अशा आशयाचा संदेश होता.

याप्रकरणी शुक्रवारी कर्नाटक पोलिसांनी , ‘‘ज्या व्यक्तीने लोकांना उघड्यावर शिंकण्यास आणि व्हायरस पसरवण्याचं आवाहन करणारी पोस्ट केली होती, त्याला अटक करण्यात आलं आहे. त्याचं नाव मुजीब असून तो Infosys या एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो” अशी माहिती दिली होती. त्यानंतर, आता Infosys ने याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.


‘कर्मचाऱ्याने केलेल्या फेसबुक पोस्टप्रकरणी आमची चौकशी पूर्ण झाली आहे. तो आमचाच कर्मचारी असून त्याने केलेली पोस्ट कंपनीच्या नियमांविरोधात आहे. त्याला कामावरुन काढून टाकण्यात येत आहे’, अशा आशयाचं ट्विट करत कंपनीने संबंधित कर्मचाऱ्याला कामावरुन काढून टाकल्याची माहिती दिली.