आपला जन्मदिवस हा कोणाहीसाठी खास दिवस असतो, मग तो माणूस असो किंवा दुसरा प्राणी. असाच एक आनंदाचा आणि उत्सवाचा दिवस श्रीकुट्टी नावाच्या एका हत्तीच्या पिलाच्या वाट्याला आला. हा दिवस तो कधीही विसरणार नाही, अशा पद्धतीने साजराही झाला.

केरळमधील कप्पूकडू पुनर्वसन केंद्रात राहत असलेल्या श्रीकुट्टी नामक हत्तीचे पिल्लू ८ नोव्हेंबर रोजी एक वर्षाचं झालं. यानिमित्त या पुनर्वसन केंद्रामध्ये मोठ्या सेलिब्रेशनचं आयोजन करण्यात आलं होतं. पिल्लू असलेल्या या मादी हत्तीणीसाठी खास ऊस, गूळ आणि अननसापासून बनवलेला भला मोठा केक तयार करण्यात आला होता. ज्यावेळी श्रीकुट्टीचं बर्थडे सेलिब्रेशन सुरु होतं तेव्हा यामध्ये पर्यटक देखील सहभागी झाले होते आणि आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात हा क्षण टिपण्यास त्यांची चढाओढ होती. एकूणच या प्राणी पुनर्वसन केंद्रात सर्वत्र आनंदाच वातावरण होतं.

या अनोख्या वाढदिवसाचे अनेक फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले असून हे फोटोच इथल्या संपूर्ण वातावरणाचे कथन करतात. या विशेष दिनी सेलिब्रेशन करताना सर्वच जण आनंदी दिसत होते. या दिवसाचं कारणही हत्तीण जन्मलेला दिवस म्हणून नव्हे तर याच दिवशी या पिलाला या पुनर्वसन केंद्रात आणण्यात आलं होतं. हा दिवस लक्षात रहावा यासाठी या वाढदिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी हत्तीच्या या गोड पिलासोबत पर्यटकांनी हसत खेळत फोटो काढून घेण्याची हौस भागवली.