दहावीचा निकाल लागल्यानंतर चर्चा रंगते ती म्हणजे सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याबाबत. पण, काल (दि.8) राज्यात दहावीचा निकाल लागल्यानंतर अजून एका विद्यार्थ्याचं नाव अनेकांच्या तोंडावर आहे. पुण्यातील धनकवडीचा श्रावण साळुंके सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. कारण, या विद्यार्थ्याने सर्वच विषयांत ३५ गुण मिळविण्याचा अवघड ‘पराक्रम’ केला आहे. हा पठ्ठ्या सर्वच्या सर्व विषयात प्रत्येकी ३५ गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे.

श्रावण हा पुण्यातील नाना पेठमध्ये राहतो. मात्र, शिक्षणाच्या निमित्ताने तो आपल्या मामाकडे धनकवडीत आला होता. मागील वर्षी ९ वीमध्ये नापास झाल्यानंतर श्रावणने धनकवडी परिसरातील रोहन माध्यमिक विद्यालयात दहावीसाठी प्रवेश घेतला होता. धनकवडी येथील बालाजीनगर परिसरातील रोहन विद्यालय ही विशेषत: बहि:स्थ विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध आहे. याच शाळेतून श्रावणने १७ क्रमांकाचा अर्ज भरला होता. श्रावण बहि:स्थ विद्यार्थी असूनही दर रोज तो शाळेत अभ्यासासाठी येत असे. श्रावणने मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, हिंदी, सामाजिक शास्त्र या सर्व विषयांत ३५ गुण मिळवण्याची ‘कामगिरी’ केली आहे.

याशिवाय दोन वर्षांपूर्वीही कोल्हापुरमधल्या एका विद्यार्थ्यानेही सर्व विषयांमध्ये ३५ गुण मिळवण्याची किमया केली होतीी. त्यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुढील शिक्षणासाठी त्याला प्रोत्साहन मिळावे, यासाठी सायकल भेट दिली होती.