लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात सर्व उद्योगधंदे ठप्प आहेत. याला विमान कंपन्याही अपवाद नाहीत. सध्या लॉकडाउनमुळे बंद असलेल्या विमान कंपन्यांची आज (शुक्रवार) ट्विटरवर ‘लॉकडाउन पे चर्चा’ पाहायला मिळाली. इंडिगो, एअर एशिया, स्पाईस जेट, एअर विस्तारा इतकंच काय तर दिल्ली विमानतळानंही या चर्चेत भाग घेतला होता. या चर्चेत अचानक एका व्यक्तीनं उडी घेतली युझर्सनं पुन्हा एकदा मजा अनुभवायला मिळाली. या चर्चेतच स्टँडअप कॉमेडीअन कुणाल कामरा “आता मला कसं वाटतंय हे कंपन्यांना कळलं असेल” असं म्हणाला.

लॉकडाउनमुळे सर्वच विमान कंपन्यांची उड्डाणं बंद आहेत. विमान कंपन्यांच्या चर्चेदरम्यान कुणाल कामरानं ट्विट करत “आता तुम्हाला कळलं… मला कसं वाटतंय,” खोचक सवाल विमान कंपन्यांना केला. काही दिवसांपूर्वी अर्णब गोस्वामी यांच्याशी झालेल्या वादानंतर कुणाल कामरावर सर्वच विमान कंपन्यांनी काही महिन्यांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.यापूर्वी विमान कंपन्यांनी शुक्रवारचा दिवस ट्विटरवर गाजवला. त्यांच्या चर्चेदरम्यान अनेक युझर्सनंही कंपन्यांना निरनिराळे प्रश्न विचारत त्यांची फिरकी घेतली.

विमान कंपन्यांमध्ये रंगलेली चर्चा

सर्वात पहिलं ट्विट केलं ते इंडिगोनं. “एअर विस्तारा. असं ऐकलंय की आजकाल तू उंच भरारी घेत नाही. पार्किंमध्येच राहा, सुरक्षित राहा.”

याचं उत्तर देताना विस्तारानं लिहिलं, “नाही इंडिगो, या दिवसांमध्ये खालीच थांबणं चांगलं आहे. भरारी घेणं हा चांगला निर्णय असणार नाही, काय म्हणतोस गो एअर.”

यावर पुन्हा गो एअरनं उत्तर दिलं,”एकदम योग्य सांगतोयस एअर विस्तारा. घरी राहणंच सुरक्षित आहे. जोपर्यंत लोकं प्रवास करणार नाहीत, तोपर्यंत आपण वाट पाहू शकतो. कारण आता लोकांना उडणं शक्य नाही. बरोबर म्हटलं ना एअर एशिया?”

यावर एअर एशियानंही ट्विट करून उत्तर दिलं. “खरंच गो एअर. सध्या घरीच थांबणं उत्तम असेल. बरोबर बोललो ना स्पाईस जेट.”

यावर स्पाईस जेटनंही भन्नाट उत्तर दिलं. “आपल्या रंगाप्रमाणे आपले विचार जुळतात हे पाहून फार बरं वाटलं. पिंजऱ्यातून पक्ष्याला उडून बराच वेळ लोटला. पण चांगल्या उद्यासाठी असं करून आम्ही खुश आहोत. हो की नाही दिल्ली एअरपोर्ट”

यानंतर दिल्ली एअरपोर्टनंही आपल्या ट्विटर हँडलवरून प्रतिक्रिया दिली. “सर्व विमान कंपन्यांशी आम्ही सहमत आहोत. लवकरच भारतातलं आभाळ पुन्हा तुमच्या रंगांनी रंगून जाईल. परंतु आता आमच्या चेहऱ्यावर हास्य खुलवण्यासाठी तुमचे धन्यवाद. सध्या पार्किंमध्येच राहा आणि सुरक्षित राहा.”