स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरा हा कायम कोणावर ना कोणावर निशाणा साधताना दिसत असतो. यावेळी पुन्हा एकदा तो आपल्या विधानामुळे वादात अडकला आहे. यावेळी तो पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. एका विमानात अर्णब गोस्वामी आणि कुणाल कामरा एकत्र प्रवास करत होते. यावेळी कुणाल कामरानं अर्णब यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. यासदर्भातील एक व्हिडीओ त्यानं ट्विटवर शेअर केला. अवघ्या काही वेळातच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे.

“आज मी लखनौच्या विमानात अर्णब गोस्वामी यांना भेटलो. त्यांना मी नम्रतेनं बोलण्याची विनंती केली. पहिल्यांदा त्यांनी फोनवर बोलत असल्याचं नाटक केलं. मी त्यांचा फोन संपण्याची वाट पाहिली,” असं कुणाल कामरानं आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

“हे सर्व मी माझ्या हिरोसाठी केलं आहे. रोहित वेमुल्लासाठी केलं आहे, असं त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. यावेळी कुणाल कामरानं अर्णब गोस्वामी यांनी काही प्रश्न विचारले. परंतु त्यांनी त्याच्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. मी २० सेकंदात आपल्या जागेवर येऊन बसलो. मी वैयक्तिकरित्या सर्व क्रू मेंबर्सची माफी मागितली. मला नाही वाटत मी कोणताही गुन्हा केला आहे. मी हे सर्व रोहित वेमुल्लासाठी केलं. मी एक व्यक्ती सोडून सर्वाची माफी मागितली,” असंही त्यानं नमूद केलं आहे.