गेल्या काही दिवसांमध्ये ऑनलाइन पद्धतीनं गंडा घातला जात असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. अशा परिस्थितीत स्टेट बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी काही माहिती दिली आहे. स्टेट बँकेनं यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. याद्वारे कोणकोणत्या प्रकारे ग्राहकांना गंडा घालण्यात येतो याबाबत त्यांनी ग्राहकांना माहिती दिली आहे. या ऑनलाइन फसवणुकीपासून वाचण्यासाठी बँकेनं काही टिप्सदेखील दिल्या आहेत.

“ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या स्कॅमरबद्दल तुम्हाला माहित आहे का? हे ते स्कॅमर्स आहेत जे एका कॉलद्वारे तुमची खासगी माहिती घेऊन अकाऊंटमधील सर्व पैसे लुटतात आणि हे केवळ होतं एका अॅपद्वारे. परंतु तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला केवळ सतर्क राहण्याची आवश्यकता आहे,” अशा आशयाचं ट्विट स्टेट बँकेकडून करण्यात आलं आहे. “अनेकदा काही लोक बँकेचे अधिकारी बनून ग्राहकांना फोन करतात. तसंच त्यांच्याकडून एक अॅप डाउनलोड करून घेतात. त्यानंतर ग्राहकाच्या रिमोट स्क्रिनचा त्यांना अॅक्सेस मिळतो. त्यानंतर ते तुमच्याकडून मिळालेल्या माहितीचा वापर करून तुमचं अकाऊंट रिकामं करतात,” असं बँकेकडून सांगण्यात आलं आहे.

यापासून सुरक्षित राहण्याकरिता कोणत्याही फोन कॉलवर, ईमेलद्वारे तसंच एसएमएस आणि वेब लिंकद्वारे आपली खासगी माहिती कोणालाही देऊ नये असं आवाहन स्टेट बँकेनं केलं आहे. तसंच गुगलवर बँकेचा कस्टमर केअर नंबरही सर्च करू नका. त्यापेक्षा बँकेच्या वेबसाईटवर जाऊन नंबर मिळवा. तसंच जे अॅप व्हेरिफाईड नसेल ते अॅप डाउनलोड करू नका, असंही बँकेनं स्पष्ट केलं आहे.

याव्यतिरिक्त बँकेनं फसवणुकीपासून वाचण्यासाठी काही टिप्सही दिल्या आहेत.

  • स्टेट बँकेशी निगडित कोणतीही माहिती घेण्यासाठी https://bank.sbi/ या वेबसाईटलाच भेट द्या.
  • कायम व्हेरिफाईड अॅप म्हणजेच Yono SBI, Yono Lite आणि Bhim SBI Pay ही अॅपचं इन्स्टॉल करा.
  • कोणत्याही मदतीसाठी कायम 1800112211, 18004253800 किंवा 080-26599990 या क्रमांकांवरच कॉल करा.
  • कोणत्याही माहित नसलेल्या लिंकवर क्लिक करू नका.