पितृपक्ष सुरू आहे. पितरांना श्राद्ध घालण्याची परंपरा आपल्या येथे आहे. पिंडाला कावळा शिवला की श्राद्धकर्म पूर्ण होतं, अशी एकूणच आपली श्रद्धा आहे. कावळ्याच्या रुपात पूर्वज पृथ्वीवर येतात, या कावळ्यांनी पिंडाला स्पर्श केला की आपल्यालाही तेवढेच समाधान मिळते. पण हल्ली अनेक ठिकाणी एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. कावळ्यांची संख्याच एवढी कमी झालीये की आजकाल कावळेही दिसेनासे झालेत. तेव्हा पिंडाला ‘काकस्पर्श’ होईपर्यंत लोकांना तासन् तास वाट बघावी लागते. नाशिकमध्ये गोदाकाठावरही श्राद्ध घालण्यासाठी लोकांची पितृपक्षात गर्दी होते. पण कावळाच नसल्याने लोकांची मोठी पंचाईत झाली. दरम्यान एका कावळ्याला पकडून त्याच्यावर पिंडाला शिवण्याची बळजबरी एका वृद्धाकडून करण्यात येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Video : …आणि कुत्र्याचा हा दयाळूपणा पाहून तुमचेही हृदय हेलावून जाईल

खास पिंडाला स्पर्श करण्यासाठी हा कावळा पकडण्यात आला, त्यासाठी पैसेही मोजले जात आहेत. अशा अनेक अफवा व्हिडिओबरोबर व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे. पण या व्हिडिओमागचं सत्य वेगळंच आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा कावळा मांजामध्ये अडकला होता. अग्निशमन दलाच्या मदतीने त्याला वाचवण्यात आले. त्याची सुखरूप सुटका केल्यानंतर येथील एक स्थानिक रहिवासी त्याला पाणी पाजण्यासाठी नेत होता. पण वाटेत पितरांना पिंड देण्यासाठी आलेल्या काही लोकांनी या कावळ्याकडून पिंडाला स्पर्श करून देण्याची विनंती त्याला केली. कावळाच्या अभावी ही माणसं अनेक तास ताटकळत बसली होती. तेव्हा त्यांच्या इच्छेला मान देऊन त्या व्यक्तीने त्याच्याजवळील कावळ्याकडून पिंडाला स्पर्श करून दिला. नंतर या कावळ्याला सोडून देण्यात आलं.

वाचा : ही आहेत भारतातील सर्वाधिक पगार देणारी ५ क्षेत्रे