‘ढिंग एक्स्प्रेस’ नावाने प्रसिद्ध असलेली भारताची गोल्डन गर्ल आणि अव्वल धावपटू हिमा दास हिची सोनेरी घोडदौद सुरूच आहे. सुवर्णपदकांचा तिने धडाकाच लावला आहे. अवघ्या 19 दिवसांमध्ये तिने तब्बल पाचव्या सुवर्णपदकाला गवसणी घातलीये. शनिवारी तिने झेक प्रजासत्ताकमधील नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री. स्पर्धेत महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत अखेरच्या क्षणात बाजी मारत सुवर्णपदक पटकावले. विशेष म्हणजे २०० मीटर शर्यतीत चार सुवर्णपदके पटकावल्यानंतर हिमा शनिवारी ४०० मीटर शर्यतीत पहिल्यांदाच धावली आणि या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. मेटूजी ग्रां. प्रि. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत हिमाने महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ५२.०९ सेकंद अशा वेळेसेह सुवर्णपदक पटकावले. या सुवर्ण कामगिरीमुळे देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

हिमा दासच्या या सुवर्ण कामगिरीची भुरळ प्रसीद्ध कवी कुमार विश्वास यांनाही पडली आहे. त्यांनी हिमा दासच्या शर्यतीचा व्हिडिओ शेअर केला असून ट्विटरद्वारे तिचं अभिनंदन केलंय शिवाय तिच्यासाठी हिंदी भाषेतून एक अप्रतिम संदेशही लिहिला आहे. ”तू धाव, अगदी वेगात धाव…भारतीय मुलींचे स्वप्न पायात बंधून धावत सूट….भारताच्या प्रत्येक मुलीच्या हक्काची जमीन तुला तुझ्या पायांनी व्यापायचीये अशी धाव….तू ज्या सामान्य घरातून आलीयेस तिथेच तुझ्या यशाचा पाया आहे…हिंदुस्तान ज़िंदाबाद” अशा आशयाचे ट्विट केले आहे. कुमार विश्वास यांच्या या ट्विटवर हिमा दासनेही रिप्लाय दिला असून तुमच्या प्रेरणादायी शब्दांसाठी आभारी आहे असं तिने म्हटलंय.


गेल्या १५ दिवसांत २०० मीटर शर्यतीत चार सुवर्णपदके पटकावणाऱ्या हिमाने ४०० मीटर शर्यतीत पहिल्यांदाच धावत या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. या शर्यतीत भारताच्या खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. व्ही. के. विस्मया हिने ५२.४८ सेकंद अशी कामगिरी करत रौप्यपद पटकावले. सरिताबेन गायकवाड हिने ५३.४८ सेकंदासह कांस्यपदक तर एम. आर. पूवाम्मा हिने ५३.७४ सेकंदासह चौथा क्रमांक प्राप्त केला. हिमाने यापूर्वी २ जुलैला पोजनान अॅथलेटिक्स येथील ग्रां.प्री. स्पर्धेत सहभागी होऊन २०० मीटरची शर्यत २३.६५ सेकंदात पूर्ण करुन सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर ७ जुलैला कुटनो अॅथलेटिक्स येथील मीट स्पर्धेत देखील २०० मीटरची शर्यंत तिने पार करत सुवर्णपदक जिंकले. १३ जुलैला झेक प्रजात्ताक येथील क्लांदो अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. १८ जुलैला झेक प्रजासत्ताक येथीलच टबोर अॅथलेटिक्स मीट स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले.