लॉकडाउनचा सर्वाधिक फटका देशभरातील स्थलांतरित मजूर आणि कामगारांना बसला आहे. या काळात उपासमारीचे चटकेही त्यांना सोसावे लागले आहेत. त्याचीच प्रचिती बिहारमधील एका रेल्वे स्थानकावर पहायला मिळाली. एका सेवाव्रत व्यक्तीनं बिस्किटांच्या पुड्यांचं इथं वाटप केलं. मात्र, भूकेनं व्याकूळ झालेल्या तरुणांमध्ये ते मिळवण्यासाठी हाणामारी होताहोता राहिली. ही दृश्य पाहून तुम्हीही अस्वस्थ व्हाल.

या घटनेचा व्हिडिओ नरेंद्र नाथ मिश्रा नामक एका ट्विटर युजरनं शेअर केला आहे. त्यावर पोटासाठी लोकांचा कसा संघर्ष सुरु आहे, असं कप्शनंही त्यानं दिलंय. बिहारच्या कटिहार रेल्वे प्लॅटफॉर्मवरचा हा व्हिडिओ असल्याचं त्यानं म्हटलंय. व्हिडिओ कुठलाही असला तरी तो भरतातला आणि लॉकडाउनच्या काळातला असल्याचं तो पाहिल्यानंतर स्पष्ट होतं. कारण, यातील काही तरुणांच्या तोंडाला मास्क लावलेलं आहे.

या व्हिडिओवर इतर युजर्सनी संमिश्र प्रतिक्रीया दिल्या आहेत. काहींनी अशाच प्रकारचे काही व्हिडिओ देखील कमेंटमध्ये पोस्ट केले आहेत. प्रत्यक्षात रस्त्यावरच जगणं आणि भूकेलं असणं हे किती वाईट असू शकतं, त्याचा हा व्हिडिओ जिवंत उदाहरण आहे.

करोना महामारीचा देशातील अर्थव्यवस्था, रोजगार या बाबींवर मोठा परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे. लॉकडाउनही आता चौथ्या टप्प्यात जाण्याची चिन्हं असल्याने गेल्या पन्नास दिवसांपासून तग धरुन बसलेल्या या परप्रांतीय नागरिकांचा आता धीर सुटायला लागला आहे. आहे त्या ठिकाणी खाण्यापिण्यापासून हाल होण्याऐवजी आपल्या घराकडं गेलेलं बरं अस आता त्यांना वाटू लागलं आहे. त्यामुळे मजुरांसाठी शासनानं रेल्वे गाड्या आणि मोफत बसची सोय केलेली असतानाही लोक मिळेल त्या मार्गाने घराकडे निघाले आहेत. पायी निघालेल्या काही मजुरांचा अपघातात मृत्यूही झाल्याच्या बातम्या आल्या आहेत.