18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

‘सर्वाधिक पराभवांसाठी राहुल गांधींचं नाव गिनिज बुकमध्ये घ्या’

मध्य प्रदेशमधल्या विद्यार्थ्याचा 'गिनिज बुक'कडे अर्ज!

लोकसत्ता अाॅनलाईन | Updated: March 20, 2017 2:18 PM

जखमांवर मीठ?

त्यांच्यावर जोक्स होतात, व्हाॅट्सअॅपवर त्यांच्याबाबत कुचाळक्या चालतात, कितीतरी टोपणनावं त्यांना त्यांचे राजकीय विरोधकच नाही पण सामान्य जनताही देते. भारतीय राजकारणावर एकेकाळी एकहाती पगडा असणाऱ्या काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची आता गिनिज बुकमध्ये नोंद केली जावी अशी मागणी मध्य प्रदेशमधल्या एका विद्यार्थ्याने केली आहे.

आता ही नोंद कुठल्या विक्रमासाठी? तर आपल्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाला सतत पराभवाचं दर्शन घडवण्यासाठी!

मध्य प्रदेशमधल्या विशाल दीवान या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने ही अजब आणि राहुल गांधींवर पुन्हा एकदा विनोदाच्या रूपात टीका करणारी मागणी केली आहे. विशाल एवढ्यावरच थांबला नाही तर राहुल गांधींचं नाव गिनिज बुकात यावं म्हणून त्याने गिनिज बुककडे अर्जही केला आहे. त्यांच्याकडे असा अर्ज करताना काही फी भरावी लागते. ही फीची रक्कमही विशाल दीवानने भरली आहे!

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाला लागलेली उतरती कळा अजूनही संपण्याचं नाव घेत नाही. गेल्या तीन वर्षात देशभर सगळ्या पातळ्यांवर काँग्रेसची जबरदस्त पीछेहाट झाली आहे आणि अलीकडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपपेक्षा जास्त जागा मिळालेल्या असतानाही तिथे भाजपचं सरकार आल्याने काँग्रेसची चांगलीच मानहानी झाली आहे.

या सर्व काळात काँग्रेसतर्फे राहुल गांधी प्रचारामध्ये उतरले होते. ते काँग्रेस पक्षाचा चेहराच झाले होते पण गेल्या २० पेक्षा जास्त निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभवाची चव मिळाली आहे.

त्यांच्याविषयी आता काँग्रेस पक्षातले दिग्गज नेतेही उघडपणे बोलू लागले आहेत. अलीकडे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांआधी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांनी ‘राहुल गांधींना अजून मॅच्युअर व्हायचं आहे’ अशी आॅन रेकाॅर्ड प्रतिक्रिया देत खळबळ उडवली होती. देशाचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते पी. चिदंबरम यांनीही गेला बराच काळ अशा आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये काँग्रेससोबत लढणाऱ्या समाजवादी पार्टीचे मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव पराभवानंतर लगेचच नरेंद्र मोदींसोबत एकाच व्यासपीठावर दिसले. यामुळे राहुल यांच्या प्रतिमेला आणखीच धक्का बसला.

वाचा- Ind vs Aus: ये बस पुजारा! ६६८ मिनिटं खेळायला गेला होतास ना?

या सगळ्यानंतर राहुल गांधींची सर्वाधिक पराभवांसाठी गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकाॅर्ड्समध्ये नोंद केली जावी ही मागणी म्हणजे काँग्रेस पक्षाच्या जखमांवर मीठच आहे. पण हा प्रकार आता सोशल मीडियावर व्हायरल होणार हे नक्कीच.

गिनिज बुकने या संदर्भात अद्यापतरी प्रतिक्रिया दिलेली नाही!

First Published on March 20, 2017 2:07 pm

Web Title: student in mp requests guinness book to mention rahul gandhi as a record holder of most defeats